बीज फाल्गुनाची येता
Submitted by पुरंदरे शशांक on 30 March, 2021 - 02:54
येता फाल्गुनाचा मास
डोह इंद्रायणी तीरी
रुख पिंपुरणी उभा
नवी पालवी मिरवी
गेले कितिक फाल्गुन
ओढ अजून तीरास
केव्हा येतील तुकोबा
आर्त भिडे गगनास
रुख सळसळ वाजे
डोहा मधून थरार
टाळ चिपळ्यांचा नाद
मंद वीणेचा झंकार
बीज फाल्गुनाची येता
रुख जाई थरारून
नाद विठ्ठल विठ्ठल
डोही तरंग भरुन
विश्वात्मक तुकयाचा
स्पर्श आगळा अजून
डोह, रुख आसमंत
जाई भक्तीत भिजून
जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल
विषय:
शब्दखुणा: