सकाळी माणसांमध्ये मला धाडून माघारी
Submitted by बेफ़िकीर on 15 July, 2020 - 13:23
सकाळी माणसांमध्ये मला धाडून माघारी
=====
सकाळी माणसांमध्ये मला धाडून माघारी
उशीचा ओलसर अभ्रा लपवतो वास्तवे सारी
तुझ्या प्रत्येक जखमेची हळद लावून हृदयाला
गझल शृंगारतो आहे तुझा आजन्म आभारी
दिवे होते तिथे हातात नव्हता हात कोणाचा
मिळाला सोबती जेव्हा निवडली वाट अंधारी
कधी कुठल्याच गाडीने मुलाला आणले नाही
तरी थांबून होती स्थानकावर खिन्न म्हातारी
कसेसे बांधलेले एक घरटे वाचवायाला
स्त्रिया कित्येकदा होतात आपणहून गांधारी
मला जे द्यायचे होते, फुकट ते द्यायचे होते
तरी या माणसांनी शेवटी केलेच व्यवहारी
विषय:
शब्दखुणा: