सकाळी माणसांमध्ये मला धाडून माघारी

Submitted by बेफ़िकीर on 15 July, 2020 - 13:23

सकाळी माणसांमध्ये मला धाडून माघारी
=====

सकाळी माणसांमध्ये मला धाडून माघारी
उशीचा ओलसर अभ्रा लपवतो वास्तवे सारी

तुझ्या प्रत्येक जखमेची हळद लावून हृदयाला
गझल शृंगारतो आहे तुझा आजन्म आभारी

दिवे होते तिथे हातात नव्हता हात कोणाचा
मिळाला सोबती जेव्हा निवडली वाट अंधारी

कधी कुठल्याच गाडीने मुलाला आणले नाही
तरी थांबून होती स्थानकावर खिन्न म्हातारी

कसेसे बांधलेले एक घरटे वाचवायाला
स्त्रिया कित्येकदा होतात आपणहून गांधारी

मला जे द्यायचे होते, फुकट ते द्यायचे होते
तरी या माणसांनी शेवटी केलेच व्यवहारी

किराणा आणि गाथा वाटल्या होत्यास मोफत पण
पिढ्या आल्या तुका, ज्यांच्यामुळे झालास व्यापारी

किती हळवे नसावे हे कधी कळलेच नाही रे
तुला सोडून ही दुनिया निघाली 'बेफिकिर' सारी

=====

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान बेफि!

प्रतिसाद बघ मिळतात फक्त चार गझलेला
कथा पुर्ण करण्यातच आहे खरी दुनियादारी!

दिवे घ्या!

सनम कधी पुर्ण करणार!

किराणा आणि गाथा वाटल्या होत्यास मोफत पण
पिढ्या आल्या तुका, ज्यांच्यामुळे झालास व्यापारी >> हा कळला नाही, बाकी सारे झकासच!

छान बेफि!

प्रतिसाद बघ मिळतात फक्त चार गझलेला
कथा पुर्ण करण्यातच आहे खरी दुनियादारी!

दिवे घ्या! ++1

छान

गझल खूपच भावपूर्ण लिहीलीय
पण "दिवे घ्या!" ---> याचा अर्थ काय?
मागे माझ्या कादंबरीच्या एका भागावर पण कोणीतरी बोललं होतं
दिवे घ्या. मला वाटल चेष्टा केलीय , गमतीने म्हटलय

किराणा आणि गाथा वाटल्या होत्यास मोफत पण
पिढ्या आल्या तुका, ज्यांच्यामुळे झालास व्यापारी

हा आवडला,
तुकारामांनी दुष्काळात अन्न मोफत वाटले होते. त्यांचे अभंग (गाथा) तर सर्वांना मोफतच होते. त्यांच्या काळात सर्वांना खुल्या दिलाने वाटलेल्या चीजांची पुढ्च्या पिढीतील मानवांनी स्वार्थासाठी विक्री केली असं बहुधा म्हणायचं असेल त्यांना

फारच सुंदर.
अलीकडे आपल्या कवितेने थोडेसे वेगळे वळण घेतले आहे असे जाणवते. बरीचशी विरक्ती आणि थोडीशी उद्विग्नता.
खुश हाल असा.

खूपच आवडली.
कसेसे बांधलेले एक घरटे वाचवायाला
स्त्रिया कित्येकदा होतात आपणहून गांधारी

मला जे द्यायचे होते, फुकट ते द्यायचे होते
तरी या माणसांनी शेवटी केलेच व्यवहारी

किराणा आणि गाथा वाटल्या होत्यास मोफत पण
पिढ्या आल्या तुका, ज्यांच्यामुळे झालास व्यापारी

हे तर खूपच आवडले.

खूप छान.
कसेसे बांधलेले एक घरटे वाचवायाला
स्त्रिया कित्येकदा होतात आपणहून गांधार... खूपच आवडला.