गिरनार.. श्री दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान : (अंतिम) भाग ५ : गुरुशिखर- चरणपादुका दर्शन
आता एक पायरी अन् बस् ते गिरिनारी स्वत: भेटणारेत आपल्याला.. मी मंदिराला नमस्कार करुन वर गेले. समोरच सुंदर त्रिमुर्तींची मुर्ती चेहऱ्यावर आश्वासक हसू ठेवून स्वागत करती झाली. मंदिर जवळ आले असतानाच मी घरून नेलेली वात, हिना अत्तर, फुले व तुळस काढून हातात ठेवलेली. ते सर्व दक्षिणेसह पुजाऱ्यांच्या हातात दिले. त्यातील खडीसाखर त्यांनी पादुकांना लावून परत दिली. त्या दरम्यान मी पादुकांना नमस्कार केला व गर्दी असल्याने हळूहळू चालत बाजूला क्षणभर थांबले. अगदी दगडात कोरलेली पावले. पुढची बोटे दिसत होती, मागच्या भागावर फुले वाहिली होती. अगदी रेखीव बोटे.