शांत

निखारे

Submitted by तो मी नव्हेच on 28 July, 2020 - 01:45

न जाणें कशी सामसूम झाली चोहीकडे आज शांत आहे
जरी पेटले ना चुलीचे निखारे जठरी ना त्यांची भ्रांत आहे

तो तसा न ऐकू जाई कुणाला, ते तसे ना कोणास दिसते
डोळ्यांत स्वप्ने जळतात आणि पोटांमध्ये आक्रांत आहे

खाजगीत रडणे असते कुठे अन् कुठे असे जाहिरातबाजी
निःशब्द रडणे रंध्रात येथे धमन्यात लाव्हा अशांत आहे

शाब्दिक पाऊस, फुसके फटाके पक्वान्न केवळ आश्वासनांचे
येथे ना येई दसरा दिवाळी पाचवीस पुजली संक्रांत आहे

छातीतला श्वास भात्याप्रमाणे फुलवीत जाई ह्रदयी निखारे
तरीही निखारे वणवे न होती डोळ्यांत पाणी प्रशांत आहे

-रोहन

सारेच आहे शांत

Submitted by _तृप्ती_ on 20 October, 2019 - 01:58

सारेच आहे शांत, आणि दिसे सुंदर
काचेतल्या घराचे, पडसाद जाती न दूर
रंगात रंगलेले, सारेच रंगीन चेहरे
मुखवटे हसरे असे कि, झाकावे दुःख गहिरे
सारीच सुंदर फुले, फुलदाणीत विसावलेली
झाडाची टवटवी मात्र दाराआडून रुसलेली
आवाज नाही इथे, विसंवाद नाही कुठे
वाचाच नसलेले, बोलके पुतळे सुरेख
येईल एक कवडसा, हे स्वप्न पहावे का
अद्याप वाजले ना पाऊलही उन्हाचे
दरवळेल रातराणी अन मोहरेल काया
उरात भरुनी पुन्हा येईल का रे माया

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - शांत