श्रीरंग

डोळ्यांत उजळते स्वप्न (भवानी वृत्त)

Submitted by माउ on 7 May, 2019 - 18:00

ओसरते शांत दुपार उन्हाचा भार नभाला होतो
सांजेची उसवुन शीव सूर्य रेखीव नव्हाळी देतो

वाळूत पसरते लाट थेंब मोकाट नाचुनी जाती
काठास बिलगते ओल अंतरी खोल आर्जवे उरती

पाण्यात चिमुकले पाय पांढरी साय स्पर्शिण्या जाती
थेंबांची होता फुले हरखुनी मुले वेचुनी घेती

मातीत खेळते पोर कुणी चितचोर स्वप्न आवरते
अलवार गुंफते ऊन तिच्याहातून सांज सावरते

केसांत अबोली फूल सुगंधी भूल वा-यात वाहे
नाही जगताचे भान तिला अभिधान नभाचे आहे

ती टपोर हसते खास निरागस आस होतसे बाधा
खेळात हरवुनी जात उरे सा-यात सानुली राधा

Subscribe to RSS - श्रीरंग