तुला साठवीते तुला आठवीते रित्या या मनाला भरावे कुठे
नको छीद्र आता कुठेही मनाला हरी अमृता साठवावे कुठे
करी चिंब ओली तुझी आर्त भक्ती असा वाहतो हा अनंता झरा
तुझ्या भिजवण्याच्या अशा द्वाड छंदात मी कोरड्याने रहावे कुठे
हरी सप्तरंगी अशा वासनांच्या जडत्वातली ही पिसे कौतुके
तुझ्यावीण घ्यावी कुणी ही शिरी हे असे भारमुक्ता जगावे कुठे
जरी मी न राधा ,जरी मी न मीरा तरी तूच तू सर्वकाही कळे
तुझा हा पसारा ,मनाचा पिसारा कसा सांग तू आवरावे कुठे
अणूरेणुलाही तुझा स्पर्श आहे ,कुठे बोध घ्यावा भुलावे कुठे
असा रोमरोमी बहरही तुझा मग पुजावे कुठे अन भजावे कुठे
तुला आवडावे असे वागताना ,तुला टाळणे हे मला शक्य ना
तुला वाहते मी अता जीवपुष्पा ,अवेळी फुलाने फुलावे कुठे
तुला अर्पिताना असे देहगेहा अता बुद्धिलाही तुझा ओघ दे
दिशाही विचारास लाभो तुझी अन ,मनाला कळावे वळावे कुठे
विसर ना पडावा तुझा मज कधीही असे रम्य सातत्य ह्रदयास दे
जपाजप घडावे असे श्वास यावे ,तुझ्यावीण तल्लीन व्हावे कुठे
असा व्यापुनी ये जळी अन स्थळी तू,मला फक्त आता तुझी आस रे
स्विकारून घ्यावे अशा मीपणाला ,अता मी अणी तू दुरावे कुठे
विठ्ठल उभा राहीला
(धृपदात थोडी आलापी घेतली आहे त्यामुळे धृपद जरा लाबंल्यासारखे वाटेल. प्रत्यक्षात
विठ्ठल उभा राहीला |
मी तो डोळा पाहीला || एवढेच धृपद आहे. )
विठ्ठल उभा राहीला
विटेवरी उभा राहीला
राहीला राहीला उभा राहीला
विटेवरी विठ्ठल उभा राहीला
मी तो डोळा पाहीला
पाहीला पाहीला डोळा पाहीला
डोळा पाहीला
मी तो डोळा पाहीला ||धृ||
वाळवंटी काठी किती नाचू गावू
विठ्ठल चरणी किती लिन होवू
आनंदाचा पुर येई
आनंदाचा पुर येई