धोका
"गप्प मरं नुसतं तटा-तटा तोडीत..." पार्थच्या पाठीत जोरात धपाटा घालतं पल्लवी म्हणाली. गोचीड तोडून काढावा अंगावरचा तसा पार्थ तिनं बाजूला केला. ढकलूनच दिलं त्याला. जाम वैतागआला होता तिला. गोचिड अन लेकरू… एक अंगातल रक्त पितं. दुसरं दुध… दुध पण रक्ताच तयार होत असेल ना? तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हतां. पार्थतर सारखाच चिटीत होता. तिनं बाजूला केला पण त्यानं भोकाड पसरलं. लेकराला कसली कळते रात्र अन बित्र? घडयाळात पाहीलं. दोन वाजल्या होत्या. बाहेर सारा अंधारच दिसत होता. इकडं तिकडं पाहिलं. जय जवळ नव्हता. कुठं गेला जय? आता तर इथ होता तो. इथं म्हणजे त्याच्या किठ्ठीतच होती ना ती?