धोका

Submitted by Prshuram sondge on 10 November, 2018 - 04:40

"गप्प मरं नुसतं तटा-तटा तोडीत..." पार्थच्या पाठीत जोरात धपाटा घालतं पल्लवी म्हणाली. गोचीड तोडून काढावा अंगावरचा तसा पार्थ तिनं बाजूला केला. ढकलूनच दिलं त्याला. जाम वैतागआला होता तिला. गोचिड अन लेकरू… एक अंगातल रक्त पितं. दुसरं दुध… दुध पण रक्ताच तयार होत असेल ना? तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हतां. पार्थतर सारखाच चिटीत होता. तिनं बाजूला केला पण त्यानं भोकाड पसरलं. लेकराला कसली कळते रात्र अन बित्र? घडयाळात पाहीलं. दोन वाजल्या होत्या. बाहेर सारा अंधारच दिसत होता. इकडं तिकडं पाहिलं. जय जवळ नव्हता. कुठं गेला जय? आता तर इथ होता तो. इथं म्हणजे त्याच्या किठ्ठीतच होती ना ती? एवढया रात्री कुठे गेला असेल? कशाला गेला असेल? संडासला गेला असेल का? ती उठली. दार नुसतं लोटलेलं, बकेट, चप्पल इथचं आहेत. संडासला चप्पला शिवाय, बकेट शिवाय कसा जाईल? कुणाच्या घरात? संशयाचा किडा तिचं डोकं पोखरु लागला.
त्या चाळीतल्या बायका, पोरी तिला आठवत राहील्या…. कांबळयाची पोरगी... शम्मी. ती जावळयाची बायको रेखी… वाघमाऱ्याची सून लती. या बायानी अनेक जणांना नादी लावलेल होतं. पुरूषांना वेड लावण्याचं औषध असतं का? त्यांच्या डोळयात? छिनाल रांडा कुठल्या…? पार्थनं भोकाड पसरलेलच होतं? तिनं पुन्हा पार्थला धपाटा घातला. अंगाशी खेचलं. ते तुटून पडलं तिच्यावर. हातानं गाऊनशी खेळू लागलं. पार्थ तिला पित होता की तिचे आतडे तोडीत होता? जीव कासावीस झाला. अंगातलं दुधच संपल तर? रक्त तर पिणार नाही ना हा? पुतणा अन कृष्ण…. यांच कुठतरी पाहिलेले चित्र तिला आठवलं. रक्तांन तोंड माखलेला कृष्ण अन तडफडणारी पुतणा….. सूचलेल्या कल्पनेचं तिचं तिलाच हसू आलं. पार्थ वंशवेल, लेकरू…. नवरा व बायकोचा सारांश असेल! पार्थ तर जय व आपल्या प्रेमाच्या वेलीवर उमललेलं फूलं. तिचा हात पार्थला कुरवाळू लागला. पाहू लागली. तिला पान्हा फुटला. पान्हा शरीरातून फुटत असेल की प्राणातून? पान्हा वात्सल्याचा पाझरच की? हृदयाच्या गाभ्यात त्याचं केंद्र असावं. पार्थ तिला चिटू लागला.
ती नुसतीच छताकडं एक टक पहात राहिली. ते पत्रे, मोडके दरवाज्या, खिडक्या. फुटकी फरशी. मच्छर व दुर्गधांच तिला काहीच वाटलं नाही. तिच्या मनात अख्ख्या भूतकाळ उंचबळून आला. माणसं… शब्द... स्वरं... स्थळं सारी चित्र तिला दिसू लागलं. आठवणी च्या एका-एका कोषातून विचाराचे भुंगे बाहेर पडतात ना? भरकटलेले भुंगे अन विचार थोडेच थांबवता येतात? जय मध्ये अलिकडे भलताच फरक पडला होता. जो तिचा शब्द झेलण्यासाठी आतूर असे. तो तिच्या एका-एका शब्दावरून चिडायचा. आकाश पाताळ एक करायचा. क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी वरून अंगावर धावून यायचा. भांडण कधीच झालं नव्हतं. पार्थचा वाढदिवस होता काल. पहिलाच वाढदिवस लेकराचं गोड कौतुक नको का करायला? लेकरांन काय करायच? आपले प्रॉब्लेम्स... सिच्यूएशनस... आपली आपल्याला. तिचं माहेर संपल होतं. ती जय सोबत प्रेमाची गाडी पुढ ढकलण्यासाठी फक्त रस्ता करत गेली.
जे समोर येईल ते आडव झालं. नुसत स्वत:ला पुढं रेटत राहिली, आई, बाबा, भैय्या.... मावशी, काका, मामा-मामी, घराणं, घराण्याची इज्जत..., इभ्रती...जात, धर्म आणि परंपरा सारं सारं लाथाडलं. प्रेमाच्या उधळलेल्या घोडयावर स्वार झाली होती ना ती? प्रेमाच्या घोडयाचा लगाम कोणाच्या हातात असतो? प्रेमिकांच्या हातात असतो का? आणखी कोणाच्या? कदाचित प्रेम पुरासारखं असेल! दुथडी भरून वाहणार. त्या प्रवाहात सापडलं त्याला वाहत नेणारं…. आपल्या हाती काय असतं? फक्त वाहत राहणं. दिशाहीन भरकटणं....
ती वाढदिवसासाठी आग्रह करत राहिली. जयची इच्छा नव्हती. तो सरळ उठला अन बाहेर गेला. तिला वाटलं आणेल केक, निर्लज्जासारखे वडा-पाव घेऊन आला. चार पाव अन दोन वडे. खा. कर मज्जा. सिलेब्रेशन नाही. हॉटलिंग नाही. साधा केक अन नविन ड्रेस आणायला काय हरकत होती? ते पण नाही. कारण काय? पैसा नाही? ती जेवली नाही. नुस्ती रडली. तो किती निष्ठुर! त्यानं तिला साधं समजावल पण नाही. लटकं-लटक सुद्धा नाही. प्रेमाच्या आणा भाका खाणारा तिच्या साठी मरायलाही तयार होणार. जय असा कसा असा वागू शकतो? प्रेम म्हणजे तरी काय असतं? ऱ्हदयात पेटलेल्या निरंजना असतीलं का? त्या कालांतराने मंद-मंद होऊन विझून जाणाऱ्या प्रेम असं एकदम लुप्त होऊ शकतं? जयच्या ऱ्हदयातील प्रेम अस विझून तर गेल नसेल ना? तिला भिती वाटली जयचं आपल्यावरलं प्रेम तर कमी झालं नाही ना!
जयच्या मिठीत शिरली ती. प्रेमाचीच मिठ्ठी ती….!!! भान हरून टाकणारी… पार्थ एका बाजूला वा जय एका बाजूला. पार्थ व जय. भूक वा वासना… जय वासनेने पेटलेला…. तर पार्थ भूकेने… भूक चिवट ... लाचार… निर्दयी…. तर वासना आंधळी व क्रूर…. तिची दया कुणालाच येत नव्हती. ती दोन्ही आगीत जळत राहीली. चुकून डोळा लागला तर जय गायब. पार्थ लचके तोडता तोडता झोपी गेला. तिच्या पोटात भूकेचा डोंब झाला होता. राग गिळून-गिळून थोडचं पोट भरतं? तिनं जय ने आणलेली कॅरिबॅग पाहिली. त्यात वडा नव्हता. पाव होता. एकच शिळा …शिळा...निंबर…. कुणी खाल्लं सारं? जय ने दुसरं कोण खाईलं? आपण असं उपाशी असताना. जय खाऊ शकतो? कल्पनाच तिला सहन होईना. जयला ही भूक लागलीच असेलं ना? त्याच्या पोटात भूकेची आग असेलच ना? भूक अन प्रेम इतकं कमजोर कसं असू शकतं? भूकेच्या आगीत वितळन जाणारं….
तिनं पाव हातात घेतला. हळूहळू खाऊ लागली पण तिचं डोळं का भरूनं आलं? खाणं आणि रडणं…. चालतच राहिलं. बराच वेळ मन उुचबळून आलेलं. उंचबळलेलं पाणी काय आणि मन सारखच. लवकर थोडच खाली बसतं. नुसत ढवळत राहतं. कधी आई बरोबर भांडण झालं तर ती रूसे. आई दमून जाई. बाबा आले की घर भरून जाई. मी नाही जेवले की सारे खोळंबून बसतं. कुणी-कुणी जेवत नसे. आई डोक्यावर हात फिरवत राही. वात्सलं कसं स्पर्शातून नसानसात पसरत जाई. माझ्या डोळयात पाणी आलं की त्यांचा जीव तीळ-तीळ तुटे. ते घास भरवातं, मन भरून येई. वात्सल्याच्या अमृतात राग वितळून जाई. पाणी-पाणी होई त्याचं. तिन त्या आठवणी झटकून टाकल्या. पाव संपला. खायला दुसर काहीच नव्हतं. ती पाणी प्याली. भरपूर. पोट भरून. पश्चातापाच्या सुरीनं तिचं काळीज छिलून काढलं जात होतं.
तिनं दार उघडून पाहिलं. त्या चाळीच्या बोळीतून ती लांबवर पाहू शकली. जय नाही दिसला. संडासला तो नक्कीच गेला नव्हता. त्याची जिन्स अन टीशर्ट ही तिथं नव्हतं. तिनं त्याचा मोबाईल ट्राय केला. "आप जिसे कॉल करना चाहते है. इस वक्त बंद है. थोडी ही देर बाद कॉल करे "तिकडून आवाज येई. ट्राय करून करून माणूस थकतचं की, जय कधी बंद करत नाही. मोबाईल त्यानं आजच का मोबाईल बंद करावा? का बंद झाला असेल? डिचार्ज फोन बूक मध्ये काही नंबर ही शोधले. सुरज…नितिन…बाबू काका…जयचे मित्र. शम्मी, रेखी, रेशमा, जावळयाची उषी. फोन कुणाला करावा? काय विचाराव? जयच्या मित्रांना फोन करावं का? एक स्त्री रात्री पुरूषांना फोन कशी करू शकेल? त्यांचे गैरसमज होतील ना? बायांना कसं विचारावं? रात्री त्यांना तरी कसं विचारावं. त्यांना का माहित असेल? त्या थोडयाच जयला राखणं बसल्यात? त्यांना वाटायचं वेगळच. भांडणाचा कहारं.
ती उठली. झोप येत नव्हती. कशी येईल? ती दाराच्या फटीतून पहात राहिली. . चाळीतली घरं. ढणाढणा जळणाऱ्या लाईटी. तिचं मन सैरावैरा झालं होत. अनेक संशयाचं काहुर मनात उठलं होतं. गोधडी गोळा केली. चादर गोळा केली. उशी हातात घेतली. तया उशीकड पहात राहिली. उश्या मळालेल्या … तेलकट… तेलाचा उग्रवास! उशी किती नवी कोरी होती! पॉश उशी अन ती…? ती तुलना करू लागली. नवं कोरं…. कुणीचं ना उपभोगलेलं. आता नवं कोरं कसं म्हणता येईल? उशील नाही अन तिला ही ….. ती तिचचं अंग पाति राहिली. संशयाच भूत माणसाला चैन पडू देत नसेल. तिनं दार उघडलं. तडातडा चालत बाहेर आली. तिला कूणाच्या ही घरात डोकावून पाहवं वाटे. उगीच वाटे जय असेल. नुसतच वाटत नव्हतं. ती पहात राही. कुणी कसं. कुणी कसं झोपलेलं. कांबळयाच्या घरात वजीऱ्या…. तिला हा शॉक होता. तिला काय… काय पाहवं लागणारं होतं? तिला चाळीची चिंता वाटू लागली. त्या वासनेच्या व दारिद्रयाच्या चिखलात फसत गेलेले क्षूद्र जीव ते! त्यांची तिला कीव आली. कोंडया बायकोला नुसता शिव्या घालत होता. ती गप्प उभी होती. अजून ही त्याची उतरली नव्हती. कशी उतरेल? एक चपटी अजून त्याच्या हातात होती. वचा वचा शिव्या देत होता. तिचं धाडस झालं नाही. ती तिकडं जाऊ शकली नाही. तिथं कुठं जय उभा आहे का हे पाहिलं. धुमाट मागं पळाली.
ती बाथरूम मध्ये गेली. चेहऱ्यावर सपा सपा पाणी मारावंस वाटलं पण नाही मारलं. तिला पाण्याची अशी चैन परवडत नाही आता. पाणी विकतचं घ्यावं लागतं. आता चाळीतल्या माणसाला कसं शक्य? सुरवातीला आल्या आल्या लॉजवरच थांबले होते ते. तब्बल तिन महिने पाण्याची चंगळ होती तिथं. बाथरूम होता. इतकं पॉश बाथरूम तिनं कधी पाहिलं नव्हतं. चकाचक….. शॉवर होता. तास तास अंघोळ करत बसायचे ते. जय आणि ती. कधी एकटं. कधी दोघं. त्या धुंद दिवसाचे अनेक क्षणचित्रे तिला दिसू लागली. आठवणीची पण एक शृखंलाच असते ना? एकी मध्ये दुसरी अडकलेली. कडीत कडी तशी आठवणीत आठवणी…..
तिच्या गावात मुबलक पाणी, तोटयाच नसलेले नळ, नळाला पाणी सुटलं की सारं गावांत पाणीच पाणी होई. नद्या, विहिरी, तळी सारे तुडुंब भरलेले, त्यात डुंबणारी माणसं, गुर, ढोरं व पाखरं. झाडं झुडप…. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या …. शेतं... डोलणारी पिकं… किती रम्य अन स्वच्छ असतात गाव, नाही? इथे ही चाळं, नाल्या गटारं… कचरा कुंडया त्यांचा सुटलेला वास. दुर्गंध. चाळीत प्रत्येक घराच्या मागं. मुताऱ्या केलेल्या…. म्हातारी माणसं, लहान मुलं नालीतच लघवीला बसतं. जंतू, मच्छर, माश्या... शहर आणि झोपड पट्टी वेगळी नसते या शहरात .फूटपाथावरचं काही संसार थाटतात अन वाढतात.आकाशाची छाया... धरतीची माया....
तिचं गाव अंतापूर. तिचं भल मोठ घर. तिचा वडील पाटील आहेत गावचं. पाटलाचा वाडा साधा कसा असेल? वाडा चिरेबंदी…. भली मोठं ढाळजं. दोन्ही बाजूला. भव्य चौक... पुढं प्रशस्त अंगण... अंगणात एका बाजूला हौदं आहे. रानातून आणलेल्या पाईप लाईनच पाणी त्यात सोडलेलं. पाणी जिथं सांडत. तिथंच तिनं चार गंलाब लावलेली. निशिगंध, सदा फुली, गुलबक्षी... अगदी दारातच भल मोठं होतं गेलेलं पारिजातकाच झाङ सकाळी अंगणभर फुलांचा सडा पडे. मंद गंध दरवळे. झुळू झुळू वाहणारा... वारा मन प्रसन्न करी. सकाळी सकाळी ती फुलं वेची, न्हाऊन. केस मोकळे सोडून कोवळया उन्हात फिरे… तो तिला चोरून पाही. मन व तन शहारून येई. तास तास फुलं वेचीत बसं. फुलं आजीला पूजेला व तिला वेणीला लागंत. केसात गजरा किंवा ताजा टवटवीत गुलाब तिला लागे वेणीत माळयाला. लिंबोणीचं झाडं, शेवग्याचं झाडं… कंदब ही तेव्हा लहान होता. आता मोठा झाला असेल. मोगरा फुलत ही असेल आता!
जय तिथंच लांब उभा राही. तिला न्याहाळत बसं. काही बहाणे करून तिथं येई.हिला ही चटक लागली होती. तो कधी फुलं मागायला तर कधी पाणी न्यायला. त्याचं घर पलीकडच होतं. हाळगावचा रस्ता ओलांडला की जयच घर ला्र. महारवाडयात सारा महारवाडा पाणी नेई. आबा साऱ्यांना पाणी देतं. जयच अन तिचं हळू हळू सूत जुळलं. प्रेम बहरलं. कधी कधी त्या हौदा मागचं ते बोलत. घरच्यांना माहित होत नसे. घरातून कुणी आवाज दिला की, घरात परत जाई. ती पुन्हा परत येई. कुणालाच पत्ता नव्हता. एक दोनदा पाहिलं त्यांना हौदा मागंआबांनी पण शेवगा, फुलं पाहिजेत असं काही सांगे. काही ही बहाणा करी. कधी नुसता हंडाच घेऊन येई. कुणी पाहिलं की लावला हौदाच्या तुटीला. भैय्याला संशय ही आला होता. जयला त्यानं हाकलून दिलं होतं. पण प्रेम इतकं कमजोर थोडं असतं? ते बहरतच चाल्लं होतं.
तिला सारं सारं आठवत राहिलं. ते घर, ते आंगण, ती झाडं… ती फुलं…. आई… बाबा… भैय्या… आता दोन वर्ष होऊन गेले होते. ते गावं ते घर अन ती माणसं… ते अंगण आता काहीच तिचं राहिलेलं नव्हतं अन ते कधी पुन्हा तिचं होणारं ही नव्हतं. भूतकाळ आपल्याला थोडा पुसता येतो?
जन्मा बरोबर जात माणसाला चिकटली जाते का? आपण जातीचा कुठं विचार केला? जातं म्हणजे एक गटार असेल? आपआपल्या माणसाला त्या गटारातून नाही बाहेर पडू दिलं जातं. एका गटाराचा त्याग केला पण जय ने दुसऱ्या गटारात आणून टाकलं. प्रेमाचे रस्ते ही शेवटी जातीलाच जाऊन मिळतात. जात सपशेल नाकारून कुठं जगत असतील माणसं? तिला पुन्हा… आपली माणसं…. आपली जात… जय व जयची जात त्यातली माणसं आठवत राहिली. माशी झटकावी तशी तिने ते विचार झटकले त्या आठवणी झटकल्या…..
पार्थ उठला. त्यानं पुन्हा भोकाड पसरलं. त्याला भूक लागी असावी. पुन्हा तिनं अंगावर घेतलं तिच्याच पोटात अन्न नव्हतं तर तिला दुध कुठूनं येईल? ते नुसतं लचके तोडीत राहिलं तसं तिचा जीव ही तीळ-तीळ तुटत राहीला. त्याला काही तरी खाऊ घालणं आवश्यक होतं. घरात कुठं काय होतं? तो पाव होता. तो पण तिनं खाल्ला. ती उठली. पार्थला कडेला घेतल. भिंतवरल्या आरशात स्वत:ला पाहिलं. केस नीट केले. बाहेर आली. शम्मी... जावळयाची पोरगी. दारातच उभी होती. ब्रश करत हाती. सारा फेस आलेला. पचा-पचा तिथंच नालीत थुकली होती. पल्लवीने तिला पाहयलं. तिला किळस आली. तिच्या कडे पाहिलं. शम्मी हासली. केसाच्या बटीचा झूटू ऐटीत मागे सारला. छान! झटका दिला. शम्मी थोडी हासली. तिच्या तोंडातला फेस खाली पडला. पल्लवी झटक्यात पुढं गेली.
तिला शम्मी अजिबात आवडत नव्हती. शम्मी… शामल कोबळे. अनेक पोराबरोबर तिची लफडी दोन दोन दिवस गायब असते. जय भोवती घुटमळते. चष्टा करते. उगीच फालतू बोलते. तिला तिनं असं जयला बोललेलं आवडत नव्हतं. पुढ गण्या... ढेरेपोटे तात्या, ढेरे पोटे, त्यांच आडनाव नाही. मोठी ढेरी म्हणून त्याला ढेरे पोटे म्हणतात सगळेच.त्याच नाव वाघमारे, आनंदा मोकशे, मामा, गायकवाड बाईचा पप्या घोळका करून उभे होते. तंबाखू चोळीत गण्यानं मोबाईलवर गाणी लावली होती. ती जवळ आली की सारेच खाकारले. सावध झाले. गण्यानं मोबाईलचा आवाज कमी केला.
"पार्थ कुमार कुठं निघाले? मॉर्निग वॉकला चाल्ले का?" गण्यानं तिच्या डोळयात आपली नजर खुपसतं विचारलं.
"पार्थचे पप्पा आलेत का इकडं? रात्री पासूनचं कुठे गेलेत? पत्ताच नाही. तुम्ही कुणी पाहिलत त्यांना?" तिन खाली पाहत विचारलं.
"नाही बुवा! आम्ही कशाला बघू. नाईटला कोण कुठं जातं. कोण कुठं येतं? पर्सनल मामला असतो एका एकाचा. नाहीतरी तसे पाहण विचारण बरं नाही. कशाला कुणाला डिस्टर्ब…." गण्या बोलला. तिला ते मुळीच आवडल नाही. ती चालू लागली.
"काय किरं किरं झाली का?" ढेरे पोटे काकानं तिला अदबीन विचारलं. त्यांच्यात तोच तर शाहाणा होता.
"तसं काही नाही. मी झोपेतच होते. उठलं तर ते गायब"
"मोबाईल लावला का? गण्या लाव बरं." गण्यानं लगेच कॉल लावला.
"नाही लागतं. स्वीच ऑफ. किती वेळा ट्राय केला?"
"नाय-नाय लागत. टुंगटुग करत अन बंद पडतं." गण्यानं स्पष्टीकरण दिलं.
"असलं इथच कुठं? कुठ जातं? प्यार किया तो डरना क्या?" मोकाश मामानं तिला आधार दिला. ती तिथून हालली. तेवढयातं गण्यानं पार्थचा हात ओढला.
"ऐ हिरो… शेंबडया… हिरो थांब. तुझा फुटू काढू. स्माइल प्लीज…" पार्थने भोकाड पसरवलं तरी त्यानं फोटो काढलाच. ती तिथून झटक्यात हालली. खरंतर त्या साऱ्या नजरा तिच्या अंगभर रेंगाळल्यार होत्या.तिला गुदमरलच होतं. दुसरं जयला शोधणं आवश्यक होतं. तो कुठ गेला असेल? का गेला असेल? या प्रश्नानं तिच डोक बंद पडलं होतं. काहीच सुचत नव्हतं. ती दिसायला सुंदर होती. हिरोईनी सारखी. तरूण तर ती होतीचं. एकदम कोवळी. दहावीत असतानाच ती जय बरोबर निघून आली होती. बरं आता पार्थ ही झाला. तो एक वर्षाचा झाला होता. ती पळवून आली होती ना म्हणून कुणी ते तिला तसलच समजायचं. प्रेम अंधळ असलं तरी ते पवित्र अन उदात्त असतं ना? अतुट असतं. वादळात दिवा संभाळणं सोप काम नाही. ते दिव्यचं असतं. त्या चाळीत आपल्या कुंकवाचं सत्व सांभाळण ही एक दिव्यच होतं.
ती चौकात आली. रमाई चौक, इंदिरा नगर, जिथं सुरू होते. तिथचं हा चौक. पान टपरी चहाचा गाडा पलिकडं भेळ, वडापावचा गाडा. त्या नालीच्या पल्याडं देशी दारूचं दुकान. तिथच दोघं तिघं मटक्याचे आकडे घेतं. तिला वाटलं त्या बाकडयावर जया बसलेला असेल! पण तिथं नव्हता. ती कम्युनिटी टॉयलेटला लागलेली रांग पाहू शकली. त्या रांगेत ही तो नव्हता. विक्या आणि सल्लू होते तिथं. जयचे मित्र. ती इतक्या सकाळी टपरीवर कशाला आली असेल? सारेच अश्चर्य चकित झाले.
"विकू भाऊ, जयला पाहिलं का?" तिनं त्यांचा आश्चर्य असं संपवून टाकलं.
"नाय बुवा! कुठ तरफडलाय तो सकाळी?" विक्या.
"रात्रीच गेलेत. मी झोपेतच होते. उठले तर गायब."
"पार्थ बेटा कुठं गंला तुझा डॅड? डॅड लयं डेंजर. असा नाही जाऊ द्याचा" विक्यानं पार्थचा हळूच गालगुच्चा घेतला. त्यानं लगेच भोकाड पसरलं.
तिनं पार्थला समजावलं.थोपटलं व म्हणाली, "रात्री तीनलाच गेले ते. दार ही उघङ नुसतं लोटलेलं…. "
"का गेला सोडून तुम्हाला इंथच?" कांबळे काकानी संशय व्यक्त केला.
"ऐ कांबळे काका, कायकू भाभी का टेन्शन बढा रहा? जय की जानभाभी, लव्ह मॅरेज केलं त्यांच्या बरोबर कोर्टात. वह भी सिंम्पल नही इंटर कास्ट. प्यार झुकता नही. टुटता नही" सल्लूने स्पष्टीकरण दिले. ते वाढलेल्या केसावरूनं तो नुसता हात फिरवत राहिला.
"पल्लू भाभी टेन्शन कायकू लेती यार? तो पाताळात गेलाना तरी त्याला गच्चीला पकडून आणू? क्या रे सल्लू भाय?" विक्यानं तिला पल्लू म्हटलेलं अजिबात आवडलं नाही. ‘पल्लू’ तिला फक्त जय म्हणतो. तिलाच ते आवडे. जय मूडमध्ये आलाकी तिला 'पल्लू' म्हणे. त्या विक्याच्या शब्दानं तिला आधार आला. प्रेमाची बहूरंगी, बहुढंगी इमारत विश्वासाच्या पायावरच उभी रहाते ना? पार्थने बिस्किटांचा पुडा बघीतला अन ओरडू लागलां,
"मला... मला…"ती त्याच्यावर रागवली. तिच्या जवळ पैसे कुठं होते?
"कांबळे काका… पार्थ को पुडा और भाभी का चाय दो." सल्लूनं कांबळे काकाला बजावलं.
"नको… नको… मला नको..." तिचा विनम्र सपष्ट नकार. एवढया गडी माणसात चहा कसा घोटणार?
"क्यू? ले लो भाभी. टेन्शन नही लेनेका." सल्लूनं विचारलं.
"नको. नको मला" ती संकोचत म्हणाली. पोटात आग पेटली असताना. ती नाकारत होती. भूक श्रेष्ठ की लाज....? भूकेच्या आगीत लाज विरघळून जात असेल.
"भाभी घ्या. सकाळी सकाळी. चहाच्या घोटाला, कुंकवाच्या बोटाला नाही म्हणू नये लेडीजने."
"जाऊ द्या… नको मला... मी ब्रश केला नाही." त्या नकारात ही होकार दडलेला होता. नकारार्थी होकार….
"वहिनी, बेड टीला पण ब्रश करतात तुम्ही? बेड टी ची तर सवय ना तुम्हाला? के.के. लॉजवर तुम्ही होता सुरवातीला तेव्हा बेड टीच घेत होता की? जयनं सांगितलं मला. क्लोजफ्रेंड. तो सारं सारं शेअर करतो तो माझ्या बरोबर." ती वरमली. विक्यानं काहीच कारण नसताना माहिती सांगितली. इथे आता ते सांगण्याची काय गरज होती? जय अस सारं शेअर करत असेल? सारं सारं म्हणजे सारचं…. ते ….किंचीत रोमांच तिच्या अंगावर उमटले. ती घाबरली… सावरली, सावध उभी राहिली. तिचया समोर चहा आला. तिनं चहा घेतला. तसाच तो चहा विक्याच्या अंगावर फेकून द्यावा अनं ताडकन निघून जावा असंही वाटलं पण तिनं तसं केलं नाही. ती चहा पिऊ लागली. पोटात भूकेचा डोंब झाला होता. ती कशानं विझवणार होती त्याला? शेवटी भूकेने लाजेचा पुन्हा एकदा पराभव केला. तिनं ग्लास तिथं ठेवला. तिथून सटकणारच होती? विक्यानं तिला थांबवलं. तिच्याकड पाहत राहिला. अर्थात ते पाहणं चांगल नव्हतं.
"आता कुठ पाहू त्याला?" पल्लवींन त्यालाच विचारलं.
"भाभी, जाओ हम देखते. बेशरम को." सल्लू चे शब्द तिला मोठा आधार देऊन गेले. ती तिथून हालली या चाळीत आश्रय देणारा सल्लूच. सल्लू त्याचं नाव नाही. सलिम त्याचं नाव. तो राहतो सलमान सारखा म्हणून सल्लू. त्याला ते नाव आवडत. गायकवाड बाईचा पोरगं ते. पहिल्या नवऱ्याचं. जयचं व पल्लवीचं कोर्ट मॅरेज करताना साक्षीदार लागतो ना? तोच साक्षीदार झाला. मागं पल्लवीच्या भौय्यानं जयला मारायला पोरं आणली व्हती तेव्हा कुणी मदतीला आलं नाही. सल्लूच उठला. जानी दोस्त. भैय्याला पळवून लावलं. त्याचा आधार होता. नाहीतर शहरात तीन तीन महीने घर भाडे थकल्यावर कोण राहू देतं? लगेच पसारा रस्त्यावर…. सल्लू सारं निभवून न्यायचा.
ती घरातली काम उरकु लागली. तिच्या हाताला उरक नव्हता. नाहीतर घरात तरी काय कामं होती? झाडणं-झुडणं… अंघोळ बिंगोळ, कपड धुणं, स्वंयपाक तर दोन दिवसापासून नव्हताच. कशी करणार स्वयंपाक? गॅस संपला होता. रॉकेल नव्हतं. ते मिळणारं ही नव्हतं. हे मिळायासाठी राशन कार्ड लागते ते कसं मिळेल? त्यासाठी गावात घर लागत. दार लागत. यांला कुठं घर व दार….? त्यांच्या प्रेमानी त्यांना गाव ही नव्हंत ठेवलं अन घर ही! आता घरात पीठ ही नव्हतं अन मीठ ही नव्हतं. खिचडी बिचडी टाकावी तर तांदूळ ही नव्हतं. उसनवारी तरी किती करणार? बरं चाळीतले सारेच हातावर पोट असलेली…. कोण कुणाल देतय ? तिला तिचे बाबा आठवले. बाबा सहज कुणाला ही धान्य वाटतात. ते पाटीलच गावाचे? सारे बलुतेदार येतात त्यांच्या घरी. आज तिच्यावरच ही पाळी आली. जय आता पुरे दोन महिने झालं काम शोधायला जाई. रोज जाई अन परत येई.त्याला काम मिळत नव्हतं का तोच करत नव्हता काय माहित? पल्लवीला काम मिळालं असतं. मुली हव्या असतात काही – काही ऑफिसमधून, कंपन्यामधून पण तिला तर काम करू द्यायच नव्हतं. खर तर ती कामाला गेलेली जयला आवडणारच नव्हतं. प्रेमात वादे… इरादे… काय कमी असतात? मनात फुललेल्या स्वप्न फुलांच्या गंधराशी वरुनच प्रेम बहरत ना? स्वत:ला लागडलेली सुंदर-सुंदर फुलं कोणती वेल तोडून टाकीन? बरं नाती राहिलीच नव्हती. प्रेमाच्या उधळलेल्या वारुच्या टापाखाली चिरडून गेली होती. नाही त्यांनी ठोकरली होती. लाथाडली होती. प्रेम इतक स्फोटक! इतक विध्वंसक! व्देषाच्या इज्जतीच्या आगीत होती ती. प्रेम करायला कुणाची –कुणाची गरज लागत नाही. पण संसार थाटायला मांडायला नाती अवश्यक असतात... रक्ताची... ती कुठं राहिली होती त्यांची?
जय कुठं गेला असेल? काम नाही. पैसा नाही. याच टेन्शन तर नसेल ना जयला? का त्या कंपनीच्या बॉसने हे शहर सोडून जायला सांगितल होतं. तो हे शहर तर सोडून गेला नसेल ना? का हे जगच? कसं शक्य? जय आपल्या शिवाय मरू कसा शकेल? ते कसं शक्य? ‘जिएंगे मरेगे’ एकसाथ तिचे विचार भरकटले. ती दारात आली. शम्मी दारातच उभी हाती. अख्खे केस मोकळे सोडलेले. त्यांना तेल लावीत बसली होती. शोभा वहिनी रोकडयाची पलीकड उन्हात बसली होती. नख टोकरीत. तिनं सारं तोंडच रेबाडून घेतल होतं. लेप लावल्या होता कसलातरी. पल्लवीला पहातच शम्मी म्हणाली, "वहिनी, जयु भैय्या आला का?"
"नाही ना. अजून ही पत्ता नाही. फोन भी लागत नाही. मनात तर उगीच काही बाही येतं." तिन चिंता व्यक्त केली.
"काय येत मनात? भैय्या, काय बेबी बॉय का?" शम्मीला तिच्याकडून काही तरी काढून घ्यायचं असावं.
"उगी आपल्या किरकिरी…." पल्लवीनं साडी नीट करत म्हटलं.
"मागं तेव्हा राडा झाला होता. ते मिटलं का?" शोभा वहिनीनं डायरेक्ट विषयच बदलला.
"कोणता राडा?" पल्लवी
"एक फुल दोन माळी. लव्ह ट्रेगल का फ्रिंगल… ते कसलं काय?"
"अगावू असतात काही पोरी! जयच्या मागच लागली होती ना ती पोरगी?"
"ती जयच्या मागं अन बॉस तिच्या…. जय…?" ट्रँगलचं की शम्मीनं स्पष्टीकरणच दिलं.
"पण जय तसा नाही. पार्थची शपथ घेतली त्यांनी तो शेण नाही खाऊ शकत. विश्वास माझा त्याच्यावर"
"तो काय… काय… खाऊ शकतो तुम्हालाच माहित?" शोभा वहिनी बोलली. दोघी खोचक हसल्या. ती वरमली. हासली नाही. तिला हसावं लागलं.
"नाही शेण कसा खाईल? वहिनी काय कमी सुंदर आहेत? वहिनी तुम्हाला बहिण असेल ना? ती पण अशीच सुंदर असेल, नाही?" शम्मी.
"नाही मी एकटीच. फक्त भाऊ मला एकच."
"ते तरी बरं. बहिण असती तर पुन्हा लोच्या!"
"कसला लोच्या?"
"लाच्या म्हणजे तिच्या लग्नाचे वांदे. लोकांच्या तोंडाला हात थोडा लावता येतोय?"
"पार्थला नाही ना आलंअजून पाहयला कुणी?" शोभा वहिनींन विषय बदलला. तिचं बांलणं पल्लवीला अजिबात आवडलं नव्हतं. कोलित घेऊन कुणी काळीज भाजून काढत असेल तर ते कुणाला आवडेल? पण ती त्यांना काय करू शकत होती?
"नाही. कुणी येणार नाही माहेरचं अनं सासरचं पण"
"त्यानं काय केलं त्यांच?"
"पार्थ माझा अन जयचा मुलगा. आमचं नात नाही मान्य त्यांना"
"नात्यांना मान्यतेची थोडीच गरज असते? मान्य असो नसो ती असतातचं… रक्ताचीच नाती ती!"
"मी मेले त्यांच्या साठी त्यांनी तोडून टाकली नाती सारी." पल्लवीन खंत व्यक्त केली.
"रक्ताची नाती तोडता येतात अशी?" शोभा वहिनीनं शम्मीला डोळा घालत म्हटलं.
"नाती असतातच कुठं? ती मानावी लागतात. नाती, धर्म, जात, घराणं, त्याची जाणारी इज्जत. सारं माणसाच्या मनात उठलेले बुडबुडे असतात. ते मनातच विरतात. रक्ताला कुठं नाती असतात? रक्त एकच असते ना? लाल भडक. मेले मी त्यांच्यासाठी. त्यांनी सुतक पाळलं माझं."
"क्काय...? असा विधी करता येतो जिवंत माणंसाचा. तुम्ही माफ केलं त्यांना?"
"कसलं माफ? मुणाला माफ? मी थुंकते त्यांच्या वर, त्याच्या घराण्यावर, त्यांच्या जातीवर, इज्जतीवर. मला ही पुसून टाकायचीत ती नाती. माझ्या मनातली. मी पण मानू शकते ना? मेलेत सारे मी. अनाथ मी… अनाथ… आई बाप नसलेली… कुणीच नसलेली…." तिला राग आला होता. ती भावूक झाली होती. डोळयात पाणी दाटलं होतं. ती गहिवरून आली.
"वहिनी, जय भऊजी व तुमच्या लव्हवर डाउट नाही. तुमचं प्रेम खरं. भक्कम. अतूट. दोन वर्षा पूर्वी याचं चाळीत एक जोडप आलं होतं. सहा महिने झाले. गेले पोरीला दिवस. तो म्हणे खाली करू. ती ऐकत नव्हती. तिच ही खरं होतं. त्यांच लग्न झालं होतं. रजिस्टर. प्रत्येक स्त्रीला आई व्हायचं असतच ना? त्या देहाचं, मनाचं उदिष्टच असत ना, मातृत्व! ती विनवणी करी. नकार देई, रडे.पुरूषच तो. निष्ठूर... गेला टाकून तिला. एका सकाळी कामाला गेला तो परतआलाच नाही. शहरात कुणीच कुणाच नसतं. आली रस्त्यावर... चाळ टग्यांच. माहेर नाही, सासर नाही. नवरा गेला टाकून. तरून पोरगी कोण सोडतं? मजबूरी तिची दुश्मन झाली. गेली दलदलीत फसतं." शोभा वहिनी त्या मीठ चोळीत होत्या तिच्या जखमेवर.
"म्हणजे…?"
"आता एका कोठीवर ती रोज मरण कवटाळते. वासनेत जळते रोज."
"अन तो कुठं गेला?"
"अजुन तरी नाही माहित कुणालाच. कशाला कोण शोधेल त्याला?" शोभा वहिनीनी एका दमातच स्टोरी सांगितली. ज्या दोघी अगदी बारिक हासल्या. ते तिला ही जाणवलं, ती तिथून लगेच हालली, काळीज कागदा सारख असत का? ते टरा टरा फाडत गेलं. शोभा वहिनीनी सांगितलं ते सारं सारं खरं असेल का? का नुसतं हिणवायाला कथा रचली असेल तिनं? स्त्रिया स्त्रियाशीच किती दुष्ट वागतात? आधार तर नाही पण?
हे सांगायची काय गरज होती? तिचं मन तिलाच खाऊ लागलं जर जय खरोखरच आला नाही तर? कुठं जायच? कुठं रहायचं? काय खायचं? शंकाच व शक्यतांच काहूर तिच्या मनात उठलं. कोठी… तसल्या बाया… गिऱ्हाईकं… सारं सारं चित्र तिच्या डोळयासमोर तरळू लागलं. तिचं मन तिलााच खाऊ लागलं जर जय खरोखरच आला नाहीतर? कुठं जायचं? कुठं राहयचं? काय खायचं? शंकाच व शक्यतांच काहूर तिच्या मनात उठलं. कोठी… तसल्या बाया… गिऱ्हाईकं… सारं सारं चित्र तिच्या डोळयासमोर तरळू लागलं.
ती उठली, जयला मोबाईल ट्राय केला. तो नॉट रिचिबलच होता. तिला त्या मोबाईलच वेडं लागलं होत. राग-राग तिनं तो दोनदा आपटला. घरातून निघे, चौकापर्यंत जाईं, दहा बारा चकरा झाल्या. टाइम ही जात नव्हंता. वेळ कुणासाठी थांबून नाही राहत, ना? आज का जात नव्हता वेळ? चाळं भर कुजबुज झाली. लोक दबक्या अवाजात बोलतं. तिला कुणीच सांगत नव्हतं. ती गेली की बोलणच बंद होई. तिला अंदाज ही बांधता येईना.अंधार पडू लागला तसा जीव कासावीस होऊ लागला. इतक्या चकरा मारल्या तरी पाय थकत नव्हते. पार्थन बिस्किट खाल्ली होती पण तिच्या पोटात कुठं काय होतं?
ती टपरी पुढ थांबली होती. पेताड पंग झाले होते. ती अंधारात जयची वाट पाहात होती. कुणी त्याच्या सारखं दिसलं की तिचा जीव भांडयात पडे. ते गेलं की कासावीस होई. इतकी माणसं येत होती. जात होती. पण तिच कोण होतं त्यात? विक्या आला. मानेच्याखाली वाढलेले केस. काळी जीन्स... टी शर्ट ग्रीन... गळयात माळाच माळा. कसल्या कसल्या माळा. तो आला आणि समोर उभा राहिला, "पल्लू वहिनी तु इथ का बसली अजून?" त्याचे शब्द ओठातच रेंगाळत बाहेर पडत होते. तो पंग होता. त्याच्या तोडाचा, वास येत होता.
"विकू भाऊ, जयचा काही ठेपा? कुठं गेला असेल?" ती गंभीरपणे बोलली.
"ऐ भाऊ नाही ओन्ली विक्की. सारे विक्की म्हणतात…. येथून पुढं तू पण विक्कीच म्हणायचं... हॅलो... विक्की… हाय हिक्की! काय समजल ना? तो हासतच बोलला. दारूच्या वासाचा भपका आला. ते गुटख्यानं बरबटलेले दात... ते हासणे नव्हतं. ती सुरी होती काळजाला चरा-चरा कापणारी…
"तू जय पाहिलास का?" अधीर होऊन तिनं विचारलं.
"नाय त्याचा फोन आला मला. अपून जॉनी दोस्त जयचा. तेर को नही आया अपून को आया." विक्की.
"कुठं जय….? कुठं गेलाय? कशाला गेलाय-कधी येतो?" एका दमात तिनं किती प्रश्न विचारावेत. काय करावं आणि काय नाही असं झालं.
"द एन्ड तुम्हारी लव्ह स्टोअरी खतम. पिक्चर खल्लास. वह गया बॉम्बे. भंयोच्योत. वह बेवफा निकला." विक्या शिव्या देऊ लागला.
"असं का बोलतोस तु? तिला राग आला. तिनं त्याची गच्ची पकडली. तिला ते खरं कसं वाटेल."
"सच्च बोलता हुं. वह काल सेंटरवाली लडकी के साथ भाग गया. सल्लू भाय्यं, तुम बताओ भाभी को सच."
"तू खोट बोलतोस…? सांग माझा, जय कुठं? सांग?" तिनं ताडकन त्याच्या तोडात मारल्या दोन. तो स्तब्ध उभा होता. खांबासारखा. तो विचित्र हासला. त्या हासण्याला ती घाबरली. त्यानं परत मारलं नाही हे काय कमी झालं? तो ड्रिंक्स करून आला होता. त्याला कुठं काय कळतं होतं?
"ऐ आपून को क्यू मारती? झक उसने मारी… बॉस उसको अभी ठपका देगा. वह सुटेगा नही."
"तू खोट बोलतोस. कसं शक्य हे..?"
"ऐ पागल रे क्या तु? कायकू झूट बोलेगा आपून? उसने फसाया तुमको."
" तूच जयच काही तरी केलंस. गद्दारेस तू. दोस्त नाही दुश्मनेस." ती पुन्हा त्याला मारायला धावली तूवढयात कुणीतरी तीला माग ओढलं. तो सल्लू होता. ती विक्याच्या अंगावर धावत होती. तो विक्या तिक्ष्ण हासला.
"भाभी भंयोच्योत निकला जय. विक्या सच कह रहा है. शूट करना चाहिए मादरच्योत को. तुमको फंसाया उसने…" सल्लूला तोंड फुटलं. त्याला राग होता. ती प्रचंड व्देषाने ओरडली, "नाही... नाही. माझा जय अस नाही करू शकतं. तुम्ही खोट बोलतात… खोटं." ती खाली कोसळली. आपल्याच हातानं तोंड बदाडू लागली. सल्लूने हात धरले. प्रेम किती आंधळ असत, नाही? तिनं तिचाच नाजूक सुंदर चेहरा मारुन मारून लाल भडक करून घेतला. सल्लूला ते पाहवत नव्हतं. मन दुभंगल्यावार देहभान हरवलं जात असेल. तिचा श्वास ही प्रचंड वाढला. ती उभ्यानचं कोसळली. सल्लू वचावचा शिव्या घालू लागला. पार्थनं बाजूला भोकाड पसरलं. त्या जीवाला थोडचं आईच दु:ख कळणार होते ?
आकाशच भिरभिर झालं होतं. जमीन फिरत असल्याचा भास झाला. प्रेम अजिंक्य असत ना? का झाला तिचा प्रेमाचा दारुण पराभव? काय चुकल होत तिचं? ती रडत होती. जयला शिव्या देत होती काय करावं? जगावं की मरावं? जयचं प्रेम लटक असेल का? का विक्कीच हे बोलणचं खोट असेल? जय कसा जाऊ शकेल आपल्याला सोडून…? पार्थला सोडून… पार्थतर वंश आहे ना त्याचा? का विक्कीनचं काही केलं असेल जयचं? प्रश्नचं प्रश्न... तिच्या डोळयासमोर एक प्रश्न चिन्ह उभं राही. ते मोठ होत जाई. अक्राळ-विक्राळ… क्षितीज व्यापून उरे..... त्यात आपण खेचल्या जाऊन अदृश्य होऊ असं वाटे तिला.
प्रेम वीजे सारखं असतं का? कवटाळलं की भाजून टाकणारं नाहीतर ती लखलखत्या चंदेरी प्रेमात भाजून कशी निघाली असती. पार्थ तिच्या कुशीत शिरत होता. विक्या…? सल्लू? नुसत्या शिव्या देत होते. पीलकड पेताड नुसती ओरडत होती. ती रडत होती. जग अंधाराच्या प्रेमात बुडून गेलं होतं.
परशुराम सोंडगे,पाटोदा
माझ्या आगामी गर्लफ्रेंड या कथासंग्रहातून)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

लेख वाचायला घेतला पण वरच्या काही ओळींचा (मिसळपाव, मिपा वगैरे) पुढच्या कथेशी संदर्भ लागेना?
म्हणून तुर्तास तिथेच थांबलो.

(लेखकाच्या आगामी गर्लफ्रेंड या कथासंग्रहातून) >> लेखक म्हणजे तुम्ही का?
अरे वा! कथासंग्रहाबद्दल अभिनंदन. अजून वाचायला आवडेल तुमच्या कथासंग्रहाबद्दल.

तुम्ही हि कथा आधी एकदा लिहिली आहे मायबोलीवर.

https://www.maayboli.com/user/64770/created
इथे जाऊन पहा. इतरही काही कथा दोनदा, तीनदा आल्या आहेत. नेटवर्कचा काही प्रोब्लेम आहे का?

साॅरी,चुकून रिपोस्ट झाली>> हरकत नाही...बदल केल्याबद्दल धन्यवाद.
आता पुन्हा नव्याने वाचायला घेतो.

सॉरी वगैरे नको उगाच.

पण मी मिपावरदेखील पाहिले आहे तुमचे प्रतिसाद दोन तीनदा येत असतात. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर एकदा सेव्ह क्लिक केल्यानंतर १०-१५ मिनिट थांबत जा परतपरत क्लिक न करता.

आणि नवीन लेख लिहिण्याआधी, मी वर जी लिंक दिलीय तिथे जाऊन एकदा बघून घ्यायचं पूर्वी कधीतरी लिहला होता का ते.

ही कथा चांगली आहे. जुन्या धाग्यावर मी प्रतिसाद दिला होता.

लिहित रहा.

जबरदस्त लिहिली आहे.
पल्लवीचा शारिरिक, सामाजिक आणि मानसिक संघर्ष थेटच काळजाला भिडतो.
सगळ्यांनी जरूर एकदा तरी वाचावीच अशी कथा.
लिहित रहा पुरुषोत्तम भाऊ.
तुमच्या कथासंग्रहाचीही थोडक्यात ओळख करून दिलेली आवडेल.