रामानुजनचे वारस: गणिताचा आनंद घेणार्या मुलांना भेटण्याचा सुखद धक्का!
Submitted by मार्गी on 22 December, 2024 - 09:58
तुम्ही गणित करता म्हणजे काय करता बरं? असा प्रश्न मला नेहमी लोक विचारतात. 'आता कुठले प्रश्न राहिलेत सोडवायचे बुवा?' असं प्रश्नचिन्ह भल्याभल्यांच्या चेहर्यावर उमटलेलं दिसतं. "Τι κάνεις όταν κάνεις μαθηματικά;" अर्थात 'जेव्हा तुम्ही गणित सोडवता तेव्हा काय करता' असा ग्रीक भाषेत प्रश्न २५०० वर्षांपूर्वी युक्लिडलाही विचारत होते म्हणे. "तात, त्वं गणिते किं करोषि?" असा प्रश्न भास्कराचार्यांनी लीलावतीच्या बाळमुखातून ऐकला असल्याचे कळाल्यास मला नवल वाटणार नाही.
भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन ह्याच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग पुढे देतो. ह्या प्रसंगाच्या अनुषंगाने आलेल्या कोड्याची मजा आपण ह्या लेखात घेऊ.