अराजक माजले आहे असे वाटून घेऊ
Submitted by बेफ़िकीर on 23 May, 2018 - 13:55
गझल - अराजक माजले आहे असे वाटून घेऊ
========
अराजक माजले आहे असे वाटून घेऊ
पुरी धर्मांध करुनी माणसे वाटून घेऊ
विचारांनी वसवलेले शहर जाळून टाकू
पुढे ह्या शांततेचे कोळसे वाटून घेऊ
तसे कोणीच नसते फारसे सच्च्या मनाचे
नका कोणी कशाचे फारसे वाटून घेऊ
विरह दुःखे अबोले त्रास त्रागा आणि अंतर
तुझ्यामाझ्यात अपुली पाडसे वाटून घेऊ
बहुतसे एकमेकातच मिळाले मिसळलेले
निराळे राहिले तितके ठसे वाटून घेऊ
घडो नजरानजर कित्येक वर्षांनी पुन्हा ती
किती करतोय आपण धाडसे! वाटून घेऊ
विषय:
शब्दखुणा: