वाहवा !!
Submitted by चैतन्य दीक्षित on 13 May, 2018 - 22:13
वाहवा मिळावी यासाठी
मी नव्हते रचिले तुज कविते,
आरसा दिसावा यासाठी
तुज हृदयी मी धरिले होते.
पाहता मला आले थोडे
दिसलोही थोडा इतरांना,
पण पूर्णबिंब दिसण्याआधी
वाहवा धडकली दोघांना
मग छिन्न भिन्न हो दर्पण ते
'मी' आणिक 'तू'चे शततुकडे
तुकड्यांतुन माझी शतबिंबे
मन कोणा कोणाला पकडे?
-------
एकाच आरशामधून का
दिसशील तुला तू पूर्णपणे?
वाहवा तुझी ना, माझी ती
बघ तुला पुन्हा तू नवेपणे !
~ चैतन्य दीक्षित
विषय: