कोठेही

कोठेही

Submitted by बेफ़िकीर on 23 February, 2018 - 04:07

गझल - कोठेही

कुणा दोघांमधे झालेच नाही युद्ध कोठेही
अशी भूमीच नाही मानवा समृद्ध कोठेही

सदा जातीयवादाचे छुपे उद्देश आढळले
न दिसला राम कोठेही न दिसला बुद्ध कोठेही

मनाची खोल सच्चाई कुणाला दाखवू आता
मला नाही मिळाले एकही मन शुद्ध कोठेही

तुला कारण कळाले तर मलाही सांग ह्या देशा
कशाने माणसे होतात हल्ली क्रुद्ध कोठेही

वयाची खिन्न पन्नाशी निराळे दृश्य दाखवते
मला दिसतात आताशा बिचारे वृद्ध कोठेही

==========
-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कोठेही