तिरुपती बालाजी हे आमचे माहेरकडून कुलदैवत. आईला घेउन जायचे होते पण तिची हालचाल कमी झाल्याने ते काही जमले नाही. तिरुपतीला जायची इच्छा व्यक्त केल्यानंतर काहीच महिन्यात ती गेल्याने ते शल्य मनातच राहिले. आपण असे किती ओळखतो आपल्या पालकांना. प्रत्यक्ष नजर भेट झाली नाही तरी वेंकटेश बालाजी हे दैवत कायमच मनात वास्तव्य करून असते. तिरुमलाचा राजा, विश्वकर्ता. ह्या मंदिरावर नॅशनल जिऑग्रोफिक्स ने केलेली डॉक्युमेंटरी बघितली आहे.
तर गंमत अशी झाली ....
आमच्या ऑफिसमध्ये एक प्रसाद नावाचा ईंजिनीअर आहे. साधारण वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झालेय. अगदी हेवा वाटावा अशी सासू त्याला मिळालीय. सासुरवाडी म्हणाल तर अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे वरचेवर तिथे जी पंचपक्वान्न बनतात, वा खास जावईबापूंसाठी बनवली जातात, ती याला घरपोच दिली जातात. आणि हा ते दुसर्या दिवशी ऑफिसला आणतो. किंबहुना ऑफिसला नेतो म्हणून त्याहिशोबाने जास्तच दिली जातात. त्यामुळे आमचीही चंगळ होते. प्रसाद आणि त्याची सासू अशी जोडी ऑफिसमध्ये प्रसिद्धच आहे. पण त्यापेक्षाही जास्त प्रसिद्ध आहे तो त्याच्या सासूने बनवलेला शिरा!