संध्याराणी

संध्याराणी

Submitted by शार्दुल हातोळकर on 7 May, 2017 - 01:27

निष्पाप कळी तुटताना गहिवरली संध्याराणी
हलक्याच प्रकाशामध्ये डोळ्यांतुन झरले पाणी

पानांची सळसळ नाही थिजलेली अवघी सृष्टी
अन् उनाड वेडा वारा निमिषातच झाला कष्टी

थरथरल्या दुःखी फांद्या भ्रमरांची खंडीत गाणी
संध्येच्या ह्रदयामधली अगतिकता पानोपानी

अनिवार बुडाल्या शोके लतिकाही लेकुरवाळ्या
कोमेजुन झुकल्या खाली सुंदरशा उंच डहाळ्या

फुललेली हजार पुष्पे आक्रंदती मुक बिचारी
नटलेल्या वनराईच्या ही कशी अवकळा दारी

विणलेली अपार स्वप्ने संध्येने कळीच्याभवती
दुष्टांच्या पुरवित मोहा नियतीला पर्वा नव्हती

Subscribe to RSS - संध्याराणी