थोडे अजून आहे

थोडे जगून झाले, थोडे अजून आहे

Submitted by बेफ़िकीर on 9 August, 2016 - 12:34

थोडे जगून झाले, थोडे अजून आहे
मीही जगाप्रमाणे आहे म्हणून आहे

केसांत मोकळ्या त्या निजलो कसाबसा मी
थाटात सावली अन् धाकात ऊन आहे

बघ चाललो तुला तर, आहे जसा.... तसा मी
हेही करून आहे, तेही करून आहे

तिरके कटाक्ष आता तिरकस कटाक्ष झाले
'मेला तसाच' त्याचा, केलास खून आहे

हा भाग वेगळा, मी, आता हयात नाही
गातेस आज तू ती माझीच धून आहे

ही 'बेफिकीर' टीका माझ्यावरील होती
ओवाळलेच जग मी माझ्यावरून आहे

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - थोडे अजून आहे