श्री संतराम (भाग दुसरा)
Submitted by मिरिंडा on 29 May, 2016 - 02:30
सुलक्षणा आलेली देवींना कळलं होतं, पण त्यांनी तिकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं. आपणच सुरुवात करावी असं वाटून ती चाचरत म्हणाली, " आज्ञा देवी........ " आणि पुढील प्रतिक्रियेसाठी थांबली. न लागलेल्या झोपेतून जाग्या होत देवी म्हणाल्या, " आलीस ? अशी मंचकाच्या जवळ ये. " दिवसाचा प्रहर असूनही कक्षात अंधारलेलं वातावरण ठेवण्यात देवींना चांगलीच रुची असायची. म्हणजे आलेल्या माणसावर दडपण येतं. आणि त्याच्या स्वतःच्या क्षमतेच्या भ्रामक कल्पनेला तडा जातो असलं काहीतरी त्यांचं तर्कट होतं. ते काही प्रमाणात खरं होतं. सुलक्षणा तशी चांगलीच अनुभवी दासी होती. तरीही देवींच्या लहरी स्वभावाचं तिला फार भय वाटे.