कुर्बान विभ्रमांवरती ही सारी दुनिया आहे
Submitted by बेफ़िकीर on 17 May, 2016 - 10:57
कुर्बान विभ्रमांवरती ही सारी दुनिया आहे
स्त्री हीच जगाची उर्जा, स्त्री हीच समस्या आहे
उत्तीर्ण इथे झालेले, जातात कुठे समजेना
अंतिम घटिका येईतो नुसतीच परीक्षा आहे
एकाही चर्येवरती संतुष्ट भाव विलसेना
मृगजळात ह्या विश्वाच्या, तहहयात तृष्णा आहे
ही स्थिती बदलण्यासाठी करतोस कशाला पूजा
तू भोग भोगणे सारे, ही खरी प्रार्थना आहे
तो होता तेव्हा त्याचे, अस्तित्त्व जाणवत नव्हते
गेल्यावर जेथे तेथे, त्याचीच वानवा आहे
मी अजून जगतो ह्याचे आश्चर्य तुला का वाटे
ही माझी इच्छा नाही, मरणाची इच्छा आहे
ती बर्याच वर्षांनंतर मिसळवून डोळे गेली
भलत्याच दिशेला बहुधा हा सूर्य उगवला आहे
विषय:
शब्दखुणा: