शब्दपुष्पांजली - मला आवडलेले गोनीदांचे पुस्तक - मृण्मयी
शाळेत चौथीत की पाचवीत 'गाडगेबाबा' नावाचा एक धडा होता. उन्हाळ्यातली चांदणी रात्र, सारवलेले नितळ अंगण. अंगणात निंबोर्याच्या झाडाची चांदण्यातली सावली. तिथंच अंगणात साध्या तरटावर घातलेली अंथरुणं. निंबोर्याखाली चांदण्यात उभी असलेली गाडगेबाबांची आकृती. त्या आकृतीच्या उपस्थितीनं की आतल्या ओढीनं टककन जागी झालेली छोटी मनू. मनूनं पटकन उठून "तुम्ही आलात बाबा?" म्हणून विचारून तात्यांना जागे करणे. आणि त्यापुढचा बहुतांश प्रसंग आजही अगदी नुकताच वाचल्यासारखा ताजा आणि हवाहवासा वाटतो.