शब्दपुष्पांजली - मला आवडलेले गोनीदांचे पुस्तक - मृण्मयी

Submitted by गजानन on 27 February, 2016 - 17:29

शाळेत चौथीत की पाचवीत 'गाडगेबाबा' नावाचा एक धडा होता. उन्हाळ्यातली चांदणी रात्र, सारवलेले नितळ अंगण. अंगणात निंबोर्‍याच्या झाडाची चांदण्यातली सावली. तिथंच अंगणात साध्या तरटावर घातलेली अंथरुणं. निंबोर्‍याखाली चांदण्यात उभी असलेली गाडगेबाबांची आकृती. त्या आकृतीच्या उपस्थितीनं की आतल्या ओढीनं टककन जागी झालेली छोटी मनू. मनूनं पटकन उठून "तुम्ही आलात बाबा?" म्हणून विचारून तात्यांना जागे करणे. आणि त्यापुढचा बहुतांश प्रसंग आजही अगदी नुकताच वाचल्यासारखा ताजा आणि हवाहवासा वाटतो. लेखक कोण, कोणत्या 'पुस्तका'तून हा धडा घातला होता, वगैरे तपशील लक्षात राहिले नाहीत पण गाडगेबाबांची अशी निवांत चांदण्या रात्रीची भेट मात्र पक्की लक्षात राहिली.

त्यानंतर नववीत आणखी एक धडा आला मनूचाच. 'संस्कार' नावाचा. मनूला तात्यांनी ज्ञानेश्वरीतले निवडक वेच्ये शिकवण्याचा. ज्ञानेश्वरीतल्या वेच्यांना खडीसाखरेची उपमा देणार्‍या मनूचा. आणि पुन्हा गाडगेबाबांच्या भेटीला बैलगाडीतून जाण्याचा. हा धडा तर तोंडपाठच झालेला. आधीची ती मनात रुतून बसलेली मनू म्हणजे हीच, हे मात्र लक्षात आले नाही. पण यावेळी धड्याच्या शेवटी दिलेले पुस्तकाचे नाव वाचून ते पुस्तक आणून भराभर वाचले. त्यातले किती कळले किती नाही. पण ही मनू कोण? आणि तिचे धड्याबाहेरचे आयुष्य कसे असेल, हे कुतुहल तेवढ्यापुरते शमले.

गो. नी. दाण्डेकरांची इतर पुस्तके वाचनात आल्यावर पुन्हा एकदा ही कादंबरी आणून वाचली. प्रत्येक वेळी तशीच उत्सुकता आणि त्याच उत्कटतेनं मनू भेटत राहिली. लहानपणीची रोगट शरिराची, सदा भोकाड पसरलेली, खोल डोहासारख्या काळ्याभोर डोळ्यांची मनू. तात्यांच्या सोबत ज्ञानेश्वरीतल्या वेच्यांची आणि तुकारामांच्या गाथेतल्या अभंगांच्या पाठांतराची शर्यथ लावणारी मनू. तात्यांच्या तनामनातून ओसंडून वाहणार्‍या कोकणप्रेमाच्या श्रवणात चिंब झालेली मनू. मनानेच तात्यांच्या वर्णनातले कोकण पिऊन येणारी मनू.

तात्यांची कोकणापासून दूर वर्‍हाडातली शिक्षकाची नोकरी, जेमतेम ताकभात भिजण्याइतका पगार. उठता-बसता इजारदारी होणारा अपमान. हे सगळं आपल्या काळ्या डोळ्यांत पचवणारी मनू. पण त्यासोबतच तात्यांच्या कोकणावरच्या प्रेमात आणि त्यांच्या ज्ञानेश्वरी-गाथेतल्या व्यासंगावर पोसणारी मनू. तेच तात्यांचं वैभव अभिमानानं आणि ताकदीनं पुढे नेणारी. तेच वैभव मनापासून उपभोगणारी. या वैभवापुढे ऐहीक जगातली अनेक मोठमोठी दु:खं पाचोळ्यासारखी फुंकून लावणारी.

आपल्या अंतकरणाचा अविभाज्य भाग असलेलं कोकण एकदातरी मनूला डोळेभरून प्रत्यक्ष दाखवावं, ही तात्यांची अंतरीम इच्छा. पण एवढ्या दूरच्या प्रवासाकरता पुंजी कुठून आणायची? त्यासाठी तात्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत दुसरी नोकरी धरली. वर्‍हाडातला कडक उन्हाळा. परत यायला टळटळीत दुपार व्हायची. पण कोकणवारीसाठी सगळे त्रास सहन करत नेटाने ते जात राहिले. अशात एकेदिवशी परतताना उष्माघाताने त्यांचा बळी घेतला. इराजदारांनी वाड्यामागच्या राहण्यासाठी दिलेल्या साध्या घरात दोघीच मायलेकी उरल्या. ज्यांच्या आधाराने हे जगणं चालू होतं तोच भक्कम वाटणारा आधार मुळापासून उखडून पडला. आभाळाला फाडून टाकील असं दु:ख कोसळलं. आता पुढे काय?

पण या दु:खानंच किशोरवयीन मनूला आईची आई बनवलं. तात्यांच्या विचारांचा, त्यांच्या ज्ञानेश्वर-तुकारामाचा संग इतका फोल नव्हता. त्यांचंच बोट धरून मनू पुन्हा उभी राहिली. यानंच मायलेकींना इराजदारी आदराचं स्थान मिळवून दिलं.

... कोकणातले स्थळ या एकाच वास्तवावर मनू लग्नाला तयार होते. मुलाचे गुण आणि घरचे सगळे, धडधडीत अवकळा डोळ्यासमोर दिसत असताना, लग्नाचे ठरवताना आईचे हृदय तुटत जाते. पण मनूचा निश्चय अढळ होता. कोकण. तात्यांचे कोकण. तात्यांची कोकणाची सूप्त तहान, जी आपल्यातही वारश्याने जशीच्या तशी उतरली आहे. त्या कोकणात पुन्हा जायला मिळणार. तिथल्या मातीला स्पर्श करायला मिळणार. तिथल्या पाण्यात मनसोक्त भिजता येणार, तिथल्या केतकीचा सुगंध उर भरून घेता येणार. तिथल्या केळींना, माडा-पोफळींना कवेत घेता येणार. त्यांच्याशी मनीचे गूज वाटता येणार. तात्या शेवटच्या श्वासासाठी जिच्या भेटीसाठी तिळतिळ तुटत राहिले; अखेरचा श्वासही त्यांनी जिच्या ध्यासात घेतला, अशी कोकणभूमी. अशी 'त्या'ची भूमी. ती ओलेती माती. तिच्यात अंकुरलेल्या असंख्य हातांनी 'तो'च मला बोलावतो आहे... ती अशी स्वतःहून मला साद घालते आहे. ती मी नाकारली तर माझे जगणे हे जगणे राहणारच नाही. तिला माझ्या श्वासातून वजा केली तर माझा स्थिपंजरही उरणार नाही. हे जे माझं आहे ते 'त्या'च्या साठी. त्याच्या भूमीत विलीन होण्यासाठीच. यापुढे सगळे सगळे क्षुल्लक.

बाहेरख्याली दुर्गुणी नवरा, लकव्याने लुळा सासरा. मूर्तीमंत भांडकुदळ खाष्ट सासू. अख्ख्या गावाशी वैर धरलेली. केवळ घरात खपण्यासाठी एका माणसाची उणीव होती ती भरून काढण्यासाठी सून म्हणून घरी आणणारे मायलेक. एक सासरा सोडला तर इथे जिव्हाळ्याचे असे कोणीही नाही. एकूणच या अख्ख्या जगात इथून दूर दूर असलेले असे जे आहेत - खचलेली आई, दुर्गी, दादा (दुर्गीचे यजमान) - ते सोडले तर ज्याच्याजवळ मन मोकळे करावे असे कोणीही नाही. जे मिळाले ते ऊठबस मानहानी आणि अपमान करणारे, मारणारे, झोडणारे. कारण असो, नसो. नवर्‍याच्या निधनानंतर वसवसलेल्या नजरांनी बघणारा शेजारी. हे सगळं कशासाठी पत्करले? स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला?

पण मनू हे बाह्य जे सगळं ते आणि तिच्या अंतरीचं जे एक, यांच्यामध्ये एक भक्कम अशी, कशानेही भेदली न जाणारी भिंत घालून घेते. त्या भिंतीपलीकडे मात्र कोणालाही शिरकाव नाही. तिथं तिचंच साम्राज्य. तिथं तिचेच सगे, तिथं तिचंच गाणं, तिथं तिच्याच 'त्या'च्याशी गूजगोष्टी, तिला मायेनं कुरवाळणारी माती, तिच्या सृजनानं तरारलेले सखेसोबती. ज्ञानेश्वर तुकारामांनी एवढे सगळे मागे ठेवलेय... तात्यांनी जे अलगद आपल्या हाती सोपवलेय.

तो जिव्हाळा, त्यांच्याशी अखंड जोडलेली आपली नाळ. तेच सख्खे. तेच खरे. तेच अक्षत.
हे सारे.
इतर कशाकशानेही तोलता येणार नाही असे. इतर कशानेही हिरावले जाणार नाही असे.
याच्यातले सुख इतर कशानेही मिळणार नाही असे.
दोन हातांनी तृप्त होईस्तोवर पित राहिलो तरी तीळमात्र कमी होणार नाही असे.

मग ते फुकट कसे मिळेल? हे बाह्यजगातले जे सगळे नशिबी आले, ते त्याचीच किंमत. ती नाही मोजली तर हे कसे लाभणार?

गोनीदांची मनू ही अशी भिडली. रोजच्या धडपडीतल्या नेमक्या कोणत्या भागाला जगणे म्हणता येईल, अशा विचारात पाडणारी.

गोनीदांचे पुस्तक वाचणे म्हणजे झरझर ते जसेच्या तसे आत उतरत जात आहे, असे वाटते. साधेसाधे शब्दच सुगंधीत होऊन दरवळ्यासारखे वाटतात. मग ते कोकणातल्या निसर्गाचे वर्णन असो की रखरखीत वर्‍हाडातल्या निंबोर्‍याचं उष्ण वार्‍यासोबत झोकणे असो की गाडगेबाबांनी खापरात ओतून घेतलेली शिळी डाळ असो. मृण्मयीत गोनीदांच्या वर्णनासोबत येणार्‍या बालकवींच्या ओळी म्हणजे तर अगदी मेजवानी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

खुप छान!
भ्रमणगाथा आणि मृण्मयी दोन्ही वाचले नव्हते. इथले लेख वाचून लगेच पुस्तके मिळवायच्या मागे लागलोय.

हे बाह्यजगातले जे सगळे नशिबी आले, ते त्याचीच किंमत. ती नाही मोजली तर हे कसे लाभणार? >>> अगदी अगदी. कादंबरीच्या मलपृष्ठावर मनूची तुलना मीरेशी केली आहे - फरक एवढाच की मीरेने कृष्णाला भजले तर मनूने निसर्गाला. दोघींनीही आपल्या नादीष्टपणाची पुरेपूर किंमत मोजली. आपल्या सारख्यांना त्यात वेदना दिसते पण त्या दोघी आपापल्या आराध्याच्या चिंतनात मग्न होत्या. त्यांना कसली वेदना न् कसले दु:ख !

गजा, मस्तच लिहीलं आहेस.

छान लिहिलेय, माझ्या आईचे हे आवडते पुस्तक.
गाडगेबाबांचा धडा शिकवायला आईच शिक्षिका होती आम्हाला त्या वर्षी.
तात्यांची कोकणची ओढ अगदी कळणारी. घरापासून लांब येऊन काही महिने उलटले की मलाही कोल्हापूर परिसराची अशीच ओढ लागते.
मनूचा अल्लड मुलगी ते संसारी राहूनही एक प्रकारची ध्येयवेडी विरक्ती असा मोठा पट आहे या पुस्तकात.

वा! वा! कसलं मन लावून लिहिलंयस Happy सुरेखच.
एकदा वाचल्यावर पुन्हा हातात घ्यायचं धारिष्ट्य झालं नाही माझं, पेलत नाही मृण्मयी.
काही पुस्तकं वाचण्यासाठी तुमचीही बैठक ताकदीची असावी लागते, मृण्मयी त्या पठडीतलं वाटतं मला.

मग ते फुकट कसे मिळेल? हे बाह्यजगातले जे सगळे नशिबी आले, ते त्याचीच किंमत. ती नाही मोजली तर हे कसे लाभणार? >>>>>> असे जगावेगळे देवप्रियत्व (भगवत्प्रेम) ज्यांना महद्भाग्याने (पण कठोर किंमत मोजूनच) मिळाले त्या बुवा(तुकोबा), जनाबाई, मीरा या सगळ्यांच्या पंक्तित मनूही दिसायला लागते हे गोनिदांच्या लेखणीतले मर्म फार सुंदररीत्या उलगडून दाखवलेत त्याकरता शतशः आभार ...

बाकी सर्व लेख संग्राह्य झालाय हे वेगळे सांगणे नकोच Happy

मस्त लिहीले आहे गजानन.
'मृण्मयी' मला खरंतर आवडत नाही, पण हे वाचून पुन्हा वाचायला हवे हे जाणवले.

गजानन छान लिहीले आहे. मृण्मयी आवडत्या पुस्तकांमधले आहे. वाचून खूपच वर्षे लोटली. फारस्म आठवत नव्हते. तुमच्या लेखामुळे थोडा आठवणींना उजाळा मिळाला.

सुंदर लिहिलंय. मृण्मयी ऐकली आहे अभिवाचनातून. लिहिलेलं मनात झिरपणं म्हणजे काय हा अनुभव गोनीदांच्या प्रत्येक पुस्तकातून मिळतो अगदी!

Pages