हक्काने डाफरते जी

हक्काने डाफरते जी, ती व्यक्ती आई ठरते

Submitted by बेफ़िकीर on 25 December, 2015 - 11:15

हक्काने डाफरते जी, ती व्यक्ती आई ठरते
कोणाचेही गुणगुणणे, हल्ली अंगाई ठरते

लीलया गझल मी रचतो, तो निबंध गणला जातो
ती चार शब्द ऐकवते, जी एक रुबाई ठरते

ती वचने, शपथा, बहुधा मरणाची कर्जे होती
हे तुझ्याविना असलेले, जगणे भरपाई ठरते

सोडणे क्षणार्धामध्ये हे तिला शोभते येथे
मी संथपणे सावरणे ही माझी घाई ठरते

मी कुठे, कसा रडतो ते, वाचू शकली असती ती
जर तिच्याकडे मन असते, हे अश्रू शाई ठरते

त्यांना मुजरा करताना का खदखदून हसतो मी
मी नसतो दुनियेमध्ये तर तेच सवाई ठरते

Subscribe to RSS - हक्काने डाफरते जी