हक्काने डाफरते जी, ती व्यक्ती आई ठरते

Submitted by बेफ़िकीर on 25 December, 2015 - 11:15

हक्काने डाफरते जी, ती व्यक्ती आई ठरते
कोणाचेही गुणगुणणे, हल्ली अंगाई ठरते

लीलया गझल मी रचतो, तो निबंध गणला जातो
ती चार शब्द ऐकवते, जी एक रुबाई ठरते

ती वचने, शपथा, बहुधा मरणाची कर्जे होती
हे तुझ्याविना असलेले, जगणे भरपाई ठरते

सोडणे क्षणार्धामध्ये हे तिला शोभते येथे
मी संथपणे सावरणे ही माझी घाई ठरते

मी कुठे, कसा रडतो ते, वाचू शकली असती ती
जर तिच्याकडे मन असते, हे अश्रू शाई ठरते

त्यांना मुजरा करताना का खदखदून हसतो मी
मी नसतो दुनियेमध्ये तर तेच सवाई ठरते

सार्‍या दुनियेला कळते, की 'बेफिकीर' आहे ती
मग तेच मी स्वतः म्हणणे, का बेपर्वाई ठरते

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाव्वा...अप्रतिम गझल!
शेवटच्या शेरांत,'मी स्वतः' ऐवजी 'स्वतः मी' असे वाचून पाहिल्यास,गेयता अधिक अढळ जाणवली!(ल.तो.मो.घा.)

हटके गझल आहे शंकाच नाही.

कमी-अधिक प्रमाणात सर्वच शेर आवडले.

मी कुठे, कसा रडतो ते, वाचू शकली असती ती
जर तिच्याकडे मन असते, हे अश्रू शाई ठरते

त्यांना मुजरा करताना का खदखदून हसतो मी
मी नसतो दुनियेमध्ये तर तेच सवाई ठरते

वरील दोन शेरात रदीफ चपखल बसत नाहीये असे मला वाटते आहे.
'ठरले असते' च्या ऐवजी 'ठरते' घेतल्याने थोडे कानाला खटकते आहे.

वरील दोन शेर सोडून बाकी गझल सामान्य वर्तमान काळात आहे. ( चू.भु दया.घ्या)

लीलया गझल मी रचतो, तो निबंध गणला जातो
ती चार शब्द ऐकवते, जी एक रुबाई ठरते >> व्वाह व्वाह

सोडणे क्षणार्धामध्ये हे तिला शोभते येथे
मी संथपणे सावरणे ही माझी घाई ठरते >> क्या बात! !!!!

बे.फी.

<<लीलया गझल मी रचतो, तो निबंध गणला जातो
ती चार शब्द ऐकवते, जी एक रुबाई ठरते>> आवडले.

बाकी द्वीपदी वाचताना मला खूप जड गेले. म्हणजे प्रत्यक्ष वाचन आणि अर्थ दोन्ही!