आज शनिवार आहे शनिवार!-भाग १
माझ्या मताप्रमाणे शिनिवार हा वारांचा राजा आहे. याचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी मन आनंदून जातं. त्यात सुट्टीची मजा आहे, काम आणि कर्तव्य पार पाडल्याचं समाधानही आहे. आठवड्यात बऱ्याच तुंबलेल्या कामाचं ओझं हा शिनिवार एखाद्या कुटुंबवत्सल घरच्या कर्त्या पुरुषाप्रमाणे आनंदाने आपल्या खांद्यावर उचलतो आणि कर्तव्य कठोराप्रमाणे पार पाडतो. याची दुपार रेंगाळलेली असली तरीही त्यात रविवारची हुरहूर नाही, मरगळ तर नाहीच नाही, आनंद आहे फक्त आनंद. शनिवारची चाहूल लागते ती गुरुवारपासून, शुक्रवार येतो तो शनिवारचा आनंद घेऊनच. शुक्रवार अर्धा संपला की शनिवारचा उत्सव सुरु होतो.