रूपं पूर्णब्रह्माची - सायली राजाध्यक्ष
पाचवी-सहावीत असेन तेव्हाची ही आठवण आहे. आम्ही तेव्हा बीडला राहात होतो. माझी आजी कॉफी घ्यायची. ती शाळेत असताना गांधीजींनी प्रत्येकाला स्वतःच्या एका आवडत्या गोष्टीचा त्याग करायला सांगितला म्हणून तिनं तिला अतिशय प्रिय असलेला चहा सोडला होता. तेव्हापासून ती कॉफी घ्यायची. आजी चिकोरीमिश्रित कॉफी प्यायची. ही कॉफी तेव्हा पत्र्याच्या लहान गोलाकार डब्यातून मिळायची. तर एका दुपारी मी आजीला उत्साहानं म्हटलं की, मी आज तुला कॉफी करून देते. मी गॅसवर शिस्तीत दूध गरम केलं, त्यात साखर घातली आणि कॉफीच्या डब्यातून कॉफी घालून उकळलं. पण मला कळेना की कॉफीचा वास असा का येतो आहे?