काय देईल गारवा रस्ता
Submitted by बेफ़िकीर on 12 December, 2014 - 10:38
गझल - काय देईल गारवा रस्ता
काय देईल गारवा रस्ता
जर उन्हाचा तुला हवा रस्ता
एक वस्ती पुकारते दुर्गम
एक इकडून पाठवा रस्ता
आज ती गोठवून गेली की
मंद आचेत वाफवा रस्ता
पोचतो जन्म त्याच मुक्कामी
घेत प्रत्येकदा नवा रस्ता
आज कोणी न आडवे आले
आज येईल आडवा रस्ता
एकमेकांमधे नका मिसळू
फक्त रस्त्यात कालवा रस्ता
सांजवेळी हयात छेडावी
गात राहील मारवा रस्ता
कोण आले असेल रस्त्यावर
फार करतोय वाहवा रस्ता
सोडले जर विचार तिमिराचे
खुद्द होईल काजवा रस्ता
ध्येय ठरवू नका स्वतःचे पण
फक्त रस्त्यास दाखवा रस्ता
पोचला 'बेफिकीर' हा जेथे
त्यातिथे फक्त पोचवा रस्ता
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: