काय देईल गारवा रस्ता

Submitted by बेफ़िकीर on 12 December, 2014 - 10:38

गझल - काय देईल गारवा रस्ता

काय देईल गारवा रस्ता
जर उन्हाचा तुला हवा रस्ता

एक वस्ती पुकारते दुर्गम
एक इकडून पाठवा रस्ता

आज ती गोठवून गेली की
मंद आचेत वाफवा रस्ता

पोचतो जन्म त्याच मुक्कामी
घेत प्रत्येकदा नवा रस्ता

आज कोणी न आडवे आले
आज येईल आडवा रस्ता

एकमेकांमधे नका मिसळू
फक्त रस्त्यात कालवा रस्ता

सांजवेळी हयात छेडावी
गात राहील मारवा रस्ता

कोण आले असेल रस्त्यावर
फार करतोय वाहवा रस्ता

सोडले जर विचार तिमिराचे
खुद्द होईल काजवा रस्ता

ध्येय ठरवू नका स्वतःचे पण
फक्त रस्त्यास दाखवा रस्ता

पोचला 'बेफिकीर' हा जेथे
त्यातिथे फक्त पोचवा रस्ता

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजा आली गझल खूप आवडली
वाफवा आणि वाहवा हे शेर अधिक आवडले

मतल्यावरून एक मतला आठवला .......

माझ्यातिल पांथस्थ सुखांची शोधत छाया होता
आयुष्याचा रोड तुझ्या स्मरणांच्या व्हाया होता

धन्यवाद

व्वा मस्त गझल ! वैवकुचा प्रतिसादही.एक माझी रचना देतेय 'वाटा' नावाची, केवळ फॉर्म आणि विषय यांची गंमत /रंगत वाढवण्यासाठी .

मस्त.
---

तिलकधारीची याच धाटणीची गजल आठवली.

शहरात पोचताना गेला बुजून रस्ता
आला असेल बहुधा गावाकडून रस्ता

डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता

सार्‍या जगास आहे चिंता तुझ्या जिवाची
ओलांडुनी पहा तू डोळे मिटून रस्ता

हासू नकोस बघुनी रस्त्यावरील वेडा
गेला असेल त्याच्या शेतामधून रस्ता

धर धीर जीवना तू, मुक्काम येत आहे
थोडी अजून वळणे, थोडा अजून रस्ता