पंचचामर

सुवर्णमध्य (पंचचामर)

Submitted by स्वामीजी on 19 August, 2014 - 13:24

बघून स्वप्न ते जगावया मिळो अशी तृषा
असून भागते कुठे, कृतीस ना तशी दिशा ?
प्रयास होत ना म्हणून अर्धस्वप्न भंगते
मलूल खिन्न रात्र ती मनामनात खंतते ॥

भरारतात पंख जे नभास साद घालण्या
तिथे न कुंपणे समर्थ हो तयास रोखण्या ।
उगाच का मनात बोल राहती उदासुनी
कशी न येत उत्तरे मुखामधून ठासुनी ?

असेल स्वावलम्ब भिस्त आपुल्या बळावरी
तया कशास सान्त्वना हवी दुज्या स्मितापरी ?
कसे बनायचे अधीन, सोबती कुणी हवे ?
पुढे चला नि आपसूक साथ धावती थवे !

असेल सौख्यलालसा तशी मिळेल यातना
म्हणून मूढ भावहीन थांबणे उपाय ना ।
मधेच भव्य उच्च लक्ष्य का कसे मिळायचे ?
पलायनास का सुवर्णमध्य नाव द्यायचे ?

Subscribe to RSS - पंचचामर