पेटलो आधीच होतो..
Submitted by संतोष वाटपाडे on 5 January, 2015 - 04:53
जीवनाचे मी कलेवर
घेतले आहे कडेवर..
अन्न दे चोचीत देवा
पोट भरते का हवेवर..
प्रेम केले पाहिजे पण
ठेव ताबा वासनेवर..
विसर पडणे हेच औषध
काळजाच्या वेदनेवर..
पेटलो आधीच होतो
कष्ट झाले ना चितेवर..
प्यायलो दुःखे निरंतर
थांबलो नाही नशेवर..
अंधश्रद्धा सोडली तर
जोर का हो प्रार्थनेवर..
कैकयी होतीच स्वार्थी
दोष गेला मंथरेवर..
लेक मोठी होत आहे
लक्ष ठेवा व्यस्ततेवर..
निर्भयाचे नाव घेता
बोट उठते दक्षतेवर..
- संतोष वाटपाडे (नाशिक)
विषय: