चैत्राची चाहूल ..
Submitted by पुरंदरे शशांक on 1 April, 2014 - 23:42
चैत्राची चाहूल
चैत्राची पालवी
तांबूस कोवळी
तप्त निखार्यात
शीतल साऊली
पळस पांगारा
फुलला भरारा
पावला भरुन
मनाचा गाभारा
शुभ्र रातराणी
मोगरा साजणी
खुळावले मन
सुगंध गगनी
रंग उधळण
मुक्त पखरण
पक्षीगण कंठी
चैतन्याचे गान
नील-लाल-पीत
पताका भरात
उभारल्या गुढ्या
हिरवी कनात
सृष्टीचे सृजन
फुटे पान पान
सोहळा देखणा
भरारले मन
विषय:
शब्दखुणा: