आपले झालेत परके आणि परके आपले
Submitted by बेफ़िकीर on 28 January, 2014 - 00:56
पोचले आहे कुठे हे दैव भटके आपले
आपले झालेत परके आणि परके आपले
चांगल्या कित्येक गोष्टी शिंपडे आभाळ हे
छप्पराचा दोष नाही नेत्र गळके आपले
गाजलेले शिल्प होणे साधले नाही कधी
गाजले जे काढले मी रोज टवके आपले
गंध वार्याने तुझा हा आणला माझ्या घरी
शेवटी नाते निघाले फार हलके आपले
काय आहे राहिले माझ्यातुझ्यामध्ये तसे
पण तरी उडतात वारंवार खटके आपले
एकट्याने झुंजल्याच्या कौतुकासाठी तरी
लागते कोणीतरी माणूस खमके आपले
एकमेकांशी कधी ना शब्द साधा बोललो
केवढे फोफावले पण वाद लटके आपले
विषय:
शब्दखुणा: