मृत्यू येणारच आहे समजावत बसलो

मृत्यू येणारच आहे समजावत बसलो

Submitted by बेफ़िकीर on 23 January, 2014 - 01:03

मृत्यू येणारच आहे समजावत बसलो
मी देहाला सारे काही मानत बसलो

पंख मलाही होते हेही कळले नाही
पिंजर्‍यातल्या अवकाशाला चिवडत बसलो

एकटेच घेण्याची इच्छा मेल्यावरती
सोबतीस घेऊन स्वतःला पाजत बसलो

रस्ता जेथे वळला तेथे वळलो नाही
रस्त्याला अपुल्या बाजूला वळवत बसलो

सारवली जी जमीन ती परक्याची होती
माझ्या घरातली माती मी उकरत बसलो

ज्यासोबत सर्वांनी विवाह केला होता
त्या जगण्याची रखेल मी कुरवाळत बसलो

चिंता वारेमाप वाढल्या माझ्या आता
फुका जगाला 'बेफिकीर' मी बनवत बसलो

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - मृत्यू येणारच आहे समजावत बसलो