सांग ना आई ऽऽ.....
Submitted by पुरंदरे शशांक on 19 January, 2014 - 22:22
सांग ना आई ऽऽ.....
खर्रे खर्रे सांग मला
गप्प बैस म्हणू नको
नसेल सांगायचं ना तुला
पापी माझी मागू नको
ढग दिसतो आकाशात
पुढे पुढे जातो कसा
दाणकन् येऊन खाली
पडत नाही बॉल जसा ?
कोण उठवतो सूर्याला
सांगतो जा सरळ असा
जाताना पुढे पुढे तो
मागे वळत नाही कसा ?
चांदोबा हा असा कसा
एकटाच फिरतो रात्रीचा
झोपवत नाही आई याची
घेऊन एक गालगुच्चा
सगळं सांगीन बाई तुला
ऐकशील का माझं जरा
गर्रम गर्रम दूध पिऊन
थोडी लोळालोळी करा
विषय:
शब्दखुणा: