एरवी जीवन सरळ साधेच होते
Submitted by बेफ़िकीर on 4 December, 2013 - 15:27
एरवी जीवन सरळ साधेच होते
श्वास जितके......फक्त तितके पेच होते
संपल्यावरतीच का कळते कळेना
आपले आयुष्य इतकेसेच होते
भावनांचा कुंभमेळा पार पडुदे
तू नको येऊस......ठेचाठेच होते
तू कि मदिरा हा न असतो प्रश्न दिवसा
रात्र होतानाच रस्सीखेच होते
एवढा जन्मून झालो क्लिष्ट मी की
उलगडावे तेवढे कोडेच होते
मी तुला नाकारण्याने देव होतो
तू मला नाकारण्याने तेच होते
वाळवाया टाकले हे मन तुझ्यावर
पण तुझेही हृदय ओलेतेच होते
जग असे का वागते आहे समजते
मी मला अभ्यासले की हेच होते
मी प्रवासाला निघालो फार मोठ्या
येथले अस्तित्व साधी ठेच होते
विषय:
शब्दखुणा: