Submitted by बेफ़िकीर on 4 December, 2013 - 15:27
एरवी जीवन सरळ साधेच होते
श्वास जितके......फक्त तितके पेच होते
संपल्यावरतीच का कळते कळेना
आपले आयुष्य इतकेसेच होते
भावनांचा कुंभमेळा पार पडुदे
तू नको येऊस......ठेचाठेच होते
तू कि मदिरा हा न असतो प्रश्न दिवसा
रात्र होतानाच रस्सीखेच होते
एवढा जन्मून झालो क्लिष्ट मी की
उलगडावे तेवढे कोडेच होते
मी तुला नाकारण्याने देव होतो
तू मला नाकारण्याने तेच होते
वाळवाया टाकले हे मन तुझ्यावर
पण तुझेही हृदय ओलेतेच होते
जग असे का वागते आहे समजते
मी मला अभ्यासले की हेच होते
मी प्रवासाला निघालो फार मोठ्या
येथले अस्तित्व साधी ठेच होते
फेडले हप्ते घराचे फार पूर्वी
घरपणाचे कर्ज पण उरलेच होते
काळजी करतोस तू तिसरीच काही
'बेफिकिर' काहीतरी तिसरेच होते
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> मी तुला नाकारण्याने देव
>>

मी तुला नाकारण्याने देव होतो
तू मला नाकारण्याने तेच होते
<<
>>
मी प्रवासाला निघालो फार मोठ्या
येथले अस्तित्व साधी ठेच होते
<<
वा!
तू कि मदिरा हा न असतो प्रश्न
तू कि मदिरा हा न असतो प्रश्न दिवसा
रात्र होतानाच रस्सीखेच होते
मस्त मस्त.. सुरेख.
पेच...रस्सीखेच..ओलेतेच..ठेच..
पेच...रस्सीखेच..ओलेतेच..ठेच....मक्ता....फार आवडले.
गझल आवडली. बहुतेक शेर आवडले.
गझल आवडली. बहुतेक शेर आवडले.
अफाट......सर..... >>>>संपल्या
अफाट......सर.....
>>>>संपल्यावरतीच का कळते कळेना
आपले आयुष्य इतकेसेच होते >>>>>
हा सर्वात जास्त आवडला...
धन्यवाद सर.
अनेक शेर आवडले
अनेक शेर आवडले
आवडली गझल...
आवडली गझल...
ठिक आहे. कोणता शेर आवडला तो
ठिक आहे. कोणता शेर आवडला तो प्रतिसादात लिहावा म्हटला तर उत्तम शेर सापडला नाही.
-दिलीप बिरुटे
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 5
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 5 December, 2013 - 10:05 नवीन
ठिक आहे. कोणता शेर आवडला तो प्रतिसादात लिहावा म्हटला तर उत्तम शेर सापडला नाही. <<<
चालायचेच, दोष तुमचा नाही.
पेच, रस्सीखेच, ठेच हे सर्वात
पेच, रस्सीखेच, ठेच हे सर्वात विशेष वाटले.
त्यातही ठेच हा खासच.
"मी तुला नाकारण्याने देव होतो
तू मला नाकारण्याने तेच होते" >>> हा शेर एका पर्टिक्युलर उदाहरणाच्या संदर्भाने मी वाचला, मला समजला.
पण जनरल संदर्भात या शेरातील खयाल ध्यानात आला नाही. (माझ्या आकलनशक्तीचा दोष असू शकेल)
मी तुला नाकारण्याने देव
मी तुला नाकारण्याने देव होतो
तू मला नाकारण्याने तेच होते
व्वा. गुंतागुंतीचा शेर आहे. काही शेर, त्यातील साधेपणा आवडला.
मी प्रवासाला निघालो फार मोठ्या
येथले अस्तित्व साधी ठेच होते
इथे अस्तित्व फिट वाटला नाही.
मीर च्या एका शेराचा प्रभाव दिसतो.
संपल्यावरतीच का कळते
संपल्यावरतीच का कळते कळेना
आपले आयुष्य इतकेसेच होते
मी तुला नाकारण्याने देव होतो
तू मला नाकारण्याने तेच होते
फेडले हप्ते घराचे फार पूर्वी
घरपणाचे कर्ज पण उरलेच होते
हे शेर अतिशय आवडले .
================
पण तुझेही हृदय ओलेतेच होते>>>या ओळीत ओलेसेच असे वाचून बघितले . (कृ.गै.न.)
जबरदस्तच - प्रचंड आवडली ही
जबरदस्तच - प्रचंड आवडली ही गजल...
मी प्रवासाला निघालो फार मोठ्या
येथले अस्तित्व साधी ठेच होते >>>> खासम् खास ......
वा! वा! बेफी नेहमीप्रमाणेच
वा! वा! बेफी
खूपच आवडली गझल.
नेहमीप्रमाणेच बहारदार...
सर्व गझलरसिकांचे मनापासून
सर्व गझलरसिकांचे मनापासून आभार मानतो.
पुरंदरे शशांक, तुम्ही
पुरंदरे शशांक,
तुम्ही उल्लेखलेली द्विपदी खास आहेच. दुसर्या क्रमांकाच्या द्विपदीपासून जो एक प्रवास सुरू होतो तो तुमच्या द्विपदीपाशी संपतो.
आ.न.,
-गा.पै.
फेडले हप्ते घराचे फार
फेडले हप्ते घराचे फार पूर्वी
घरपणाचे कर्ज पण उरलेच होते>>>>
ही द्वीपदी आवडली!
संगीता जोशींच्या नंतर हा
संगीता जोशींच्या नंतर हा एकमेव "पेच" बहुधा...
संगीता जोशींच्या नंतर हा
संगीता जोशींच्या नंतर हा एकमेव "पेच" बहुधा...>>>
शोधल्या तर भरपूर मिळतील! संगीता जोशींची पहिलीच असावी; आणि छोट्या बहरमधील आहे म्हणून जास्त भावते!
संपल्यावरतीच का कळते कळेना
संपल्यावरतीच का कळते कळेना
आपले आयुष्य इतकेसेच होते
तू कि मदिरा हा न असतो प्रश्न दिवसा
रात्र होतानाच रस्सीखेच होते
या दोनही द्विपदी सुंदर....
भावनांचा कुंभमेळा पार पडुदे
तू नको येऊस......ठेचाठेच होते
हाही छान शेर. पण.. ** तू नको येऊस** या शब्दरचनेबरोबर वरच्या ओळीत ** पार पडुदे** ऐवजी -होत आहे- अशी बातमी देऊन -तू नको येऊस- असे आले असते तर अधिक चांगले. अर्थात हे माझे मत.