आता सुरू नव्याने

अर्ध्यात सोडलेल्या ओळी मला म्हणाल्या

Submitted by आनंदयात्री on 11 November, 2013 - 01:37

इच्छा क्षणात सरता, रस्ता भकास झाला
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला

फुलत्या वयात सारे भलतेच थेट वाटे
कलत्या वयात नुसता अस्वस्थ भास झाला

आली कुठुन जराशी चाहूल वादळाची
गुर्मीत वाहणारा वारा उदास झाला

सार्‍याच जाणिवा त्या आल्या वयात जेव्हा
मग भार यौवनाचा अल्लड मनास झाला

स्वप्नातही मनाने मन मारले स्वतःचे
स्वप्नातही मनाला तितकाच त्रास झाला

अर्ध्यात सोडलेल्या ओळी मला म्हणाल्या -
अव्यक्त भावनांचा निष्फळ प्रयास झाला

Subscribe to RSS - आता सुरू नव्याने