तू पायवाट तू चंद्रकिरण तू काठी
तू श्वासामधल्या सप्तसुरांच्या गाठी
भय सरते ज्याने पाय उचलला जातो
तू स्पर्श तसा शाश्वत फ़िरणारा पाठी...
आभाळ निळाई मेघ मृदुल तू वारा
तू उत्तरेतला स्थिर सनातन तारा
स्पर्शातुन गंधित हिरवे कोंब उमलती
तू श्रावण माती चिंब क्षणांच्या धारा...
तू अल्लड शैशव झोक्यावरली गाणी
तू निर्मळ निर्झर तुषार झरझर पाणी
रोमांचित होती कडेकपारी कातळ
तू गुंजारव तू शीळ हवेची रानी...
तू वनराईचे नाजुक हळवे हसणे
निद्रिस्त खगांची आभाळाची स्वप्ने
तू नभातल्या लखलखत्या चांदणवाती
तू चंद्राची थरथर रजगंध झिरपणे...
तू क्षितिजाच्या थरथरत्या केशरमाळा
जणु लाजाळूसम पापण्या मिटतेस तू,
कशी ग स्वतःमध्येच सखे रमतेस तू ||
स्वप्नी स्पर्श तुझा वाटतो खराखुरा ,
भास होतो जेव्हा समोर असतेस तू ||
नकळतपणे मजला नजर कळते तुझी ,
शहारते मन जशी सुंदर हसतेस तू ||
चिडतो ग वारा, चुकतोही त्याचा रस्ता ,
चुकवून नजर जेव्हा अश्रू ढाळतेस तू ||
तू नसतांना हे जीवन भकास वाटे ,
झकास वाटे जेव्हा हळुच लाजतेस तू ||
अशी तू......
फुलांफुलांवर भिरभिरणारी प्रत्येकाची नजर,
तुला बघताच क्षणी शांत होते |
व्याकूळ झालेल्या प्रत्येक मनाला मग,
तुझ्या अस्तित्वाची जणीव होते ||
सभोवतालचे आसुसलेले कान फक्त,
तुझ्या मंजूळ वाणीची वाट बघतात |
तुझे ते मधाळ हास्य बघून ,
सगळेच स्वर्गसूख अनुभवतात ||