अंधारुन आले तरी परतली नाही अजून
जरा बघता का कोपऱ्यापर्यंत जाऊन...
- वयात आलेल्या मुलीच्या काळजीने
रडवेली बायको येरझारते अंगणात,
माझ्या आश्वासक शब्दांनी
तिचे होत नाही समाधान
तुळशीपुढची विझू-विझू जाते फुलवात
लाडकोडाला असावी एक मर्यादा
फार ढील देत गेलो तर उद्या-
हातची जायची पोर,
सांजसकाळ दळभद्री लक्षणं
नटणं मुरडणं.. फैशनबिशन
नसता मेला जीवाला घोर...!
आपण सर्वजण किती ढोंगी, खोटारडे आणि दुटप्पी वागणारे आहोत याचा अश्लील गाण्यांना टीव्हीवर बंदी घालण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. "मुन्नी बदनाम हुई", "शीला कि जवानी" , "हलकट जवानी" अशी काही उत्तान व बीभत्स गाणी टीव्हीवर दाखवू नयेत अशी सेन्सॉर बोर्डाने शिफारस केली आहे. प्रत्यक्षात प्रक्षोभक जाहिराती व स्त्री-देहाचे भडक दर्शन घडवण्यात टीव्हीने आता इतकी पुढची पायरी गाठली आहे कि अशा गाण्यातली अश्लीलता त्यापुढे अगदीच मवाळ ठरेल.