जनरेशन गॅपच्या कोंडीत

Submitted by पॅडी on 11 March, 2024 - 01:33

अंधारुन आले तरी परतली नाही अजून
जरा बघता का कोपऱ्यापर्यंत जाऊन...

- वयात आलेल्या मुलीच्या काळजीने
रडवेली बायको येरझारते अंगणात,
माझ्या आश्वासक शब्दांनी
तिचे होत नाही समाधान
तुळशीपुढची विझू-विझू जाते फुलवात

लाडकोडाला असावी एक मर्यादा
फार ढील देत गेलो तर उद्या-
हातची जायची पोर,
सांजसकाळ दळभद्री लक्षणं
नटणं मुरडणं.. फैशनबिशन
नसता मेला जीवाला घोर...!

परवा म्हणे भर चौकात
चारसहा टग्यांच्या घोळक्यात
खुशाल हसत खिदळत होती,
सांगा-समजवायला गेले तर
- काकूबाई शोभतेस खरी! वगैरे
काय काय मुक्ताफळं उधळत होती

आम्ही एवढ्या शिकलो सवरलो
पण सोडली नाही चाकोरी
ना गुंतवली रोगट नजरेत नजर,
शिट्ट्या-बिट्ट्या...सांकेतिक शब्दबाण
खूप पडल्या टोळभैरवी उड्या
पण हातचा सुटला नाही आईचा पदर

मुलीच्या विस्तारत्या परिघाला
द्यावी उत्स्फूर्त दाद
का बायकोच्या पिसं झडल्या पंखांमधून
फिरवावीत सांत्वनाची बोटं
मी घिरटावतो स्वतःभोवती,
एक झंजावाती वादळी थैमान
दुसरी तकलादू संस्काराच्या कोंडीत
उभारून भक्कम संरक्षक भिंती

तेवढ्यात तीरासारखी घरात शिरते मुलगी
हा य पप्पा! लगेच आईला बिलगते
सॉरी मम्मा; उशीर झाला
आधी खायला दे ; मग किनई
एका मजनूला कसा पिद्दाडला
त्याची तुला मज्जा सांगते...

बाई बाई हद्द झाली तुमची
हिला सांगत का नाही
चार समजुतीच्या गोष्टी -
बायको मला खोटे खोटे खडसावते ,
लाडक्या लेकीच्या नाकाचा
लालमलाल शेंडा चिमटीत पकडून
उधळते कौतुकाचा बेलभंडार:
खबरदार जागची हललीस तर
मी लगेच मीठमोहऱ्या घेऊन येते..!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

किल्ली, MazeMan - प्रतिक्रियेसाठी आपले आभार!