जाता येता बंद करा रे दार मनाचे

जाता येता बंद करा रे दार मनाचे

Submitted by बेफ़िकीर on 17 August, 2013 - 05:01

जाता येता बंद करा रे दार मनाचे
खुले न राहो मुळीच कोषागार मनाचे

समोर दिसली मान फिरवुनी निघून गेली
मस्त निखळले शेवटचे आधार मनाचे

माझ्या असण्यासाठी सारे जग असते हे
असे वाटणे हेसुद्धा उपकार मनाचे

जे झाले ते व्हावे वाटत होते माना
स्वप्न हवे ते होते मग साकार मनाचे

तुला मानतो माता भगिनी जगासमोरी
कशास सांगू सांग तुला व्यभिचार मनाचे

खुद्दारी फुसकी माझ्या लाचार मनाची
लाचारी वैशिष्ट्य तुझ्या खुद्दार मनाचे

देह जाळला अस्थि बुडवल्या कविता विकल्या
कुणी चोरले समजेना भंगार मनाचे

बरी चांगली हलकट स्वार्थी खरी नि खोटी
दुनिया म्हणजे निव्वळ आविष्कार मनाचे

Subscribe to RSS - जाता येता बंद करा रे दार मनाचे