झोपेतही माझा अहं उद्दाम स्वप्ने पाडतो
Submitted by बेफ़िकीर on 8 August, 2013 - 14:05
जग गोधडी मानून मी ही गोधडी लाथाडतो
झोपेतही माझा अहं उद्दाम स्वप्ने पाडतो
काढून घे पायातला हा पाय आयुष्या तुझा
ही गाढवे म्हणतात की हाही दुगाण्या झाडतो
भेटून ती भेटू नको म्हणते तरीही भेटते
त्यालाच देते लाच ती जो पावतीही फाडतो
या कायद्याला एकटा अपवाद ठरतो आरसा
मी चेहरे पाहून सार्या माणसांना ताडतो
पाणी तुला पाजू कसे असल्या फिकीरी सोडुनी
ओले करत डोळे तुझे हा 'बेफिकिर' ओसाडतो
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: