तू
Submitted by शुभानन चिंचकर 'अरुण' on 2 April, 2013 - 09:33
तुझी जिन्दगानी फुलांचीच होती , इथे गंध उधळून गेलास तू
अता पाय बागेमधे ठेववेना ... अकस्मात निखळून गेलास तू
अजूनी तुझा भास होतो मनाला , अजूनी तुझा स्पर्शही जाणवे
पिसाने मनाला जसे कुर्वळावे , असा खूप जवळून गेलास तू !
कशी थांबवू आर्त आंदोलने मी , कशी थोपवू अंतरी वादळे ?
सुनामी कशी ही जगावेगळी रे , उभा जन्म ढवळून गेलास तू
युगांचा असा जीर्ण अंधार कोठे , कुणी दूर केलाय का सांग ना ...
समाधान हे की दिव्याच्या प्रमाणे , सुनी रात्र उजळून गेलास तू !
मला वाटलेले तुझ्या संगतीने , फुलावे उन्हातूनही चांदणे ...
'अरूणोदयाने' विरावे जसे दव , तसा हाय, निथळून गेलास तू ...
विषय:
शब्दखुणा: