शहरात पोचताना गेला बुजून रस्ता

शहरात पोचताना गेला बुजून रस्ता

Submitted by तिलकधारी on 20 March, 2013 - 07:58

शहरात पोचताना गेला बुजून रस्ता
आला असेल बहुधा गावाकडून रस्ता

डोळ्यांत सापडेना स्पर्शात आढळेना
आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता

सार्‍या जगास आहे चिंता तुझ्या जिवाची
ओलांडुनी पहा तू डोळे मिटून रस्ता

हासू नकोस बघुनी रस्त्यावरील वेडा
गेला असेल त्याच्या शेतामधून रस्ता

धर धीर जीवना तू, मुक्काम येत आहे
थोडी अजून वळणे, थोडा अजून रस्ता

विषय: 
Subscribe to RSS - शहरात पोचताना गेला बुजून रस्ता