जरा दूर जाऊ
Submitted by जो_एस on 19 March, 2013 - 01:10
जरा दूर जाऊ जनां पासुनी
नशीबास ताडू दिवा घासुनी
चला हस्तरेषा नव्या काढुया
मिटाव्या कशा पण जुन्या घासुनी?
विरे आठवांचा मनोरा तशी
पुढे वाट लागे दिसाया सुनी
जगाचा कसा गूण छायेसही
मला टाळते ती तमी हासुनी
जरा सत्यवाचा कुणी बोलला
पहातात सारेच आवासुनी
कळे भांडणाऱ्यांस ना शेवटी
सुरूवात झाली कशा पासुनी
खरा तोच ठरतो जगाच्या मते
असत्यास सांगेल जो ठासुनी
असा दगड कोणी, न चिंता करा
बना देव, शेंदूर घ्या फासुनी
नसे देव होणे सुखाचे तसे
अधी लागते घ्यायला तासुनी
सुधीर
विषय:
शब्दखुणा: