रोज रात्री शोडषेला पंधरावे लागते

रोज रात्री शोडषेला पंधरावे लागते

Submitted by बेफ़िकीर on 26 November, 2012 - 05:10

रोज रात्री शोडषेला पंधरावे लागते
लेखणीच्या यौवनाला आवरावे लागते

आशयाचे थेंब गुंते सोडुनी झटकायला
मन तुझ्या केसांप्रमाणे विंचरावे लागते

यामुळे सत्यात नाही फारसा दमवत तुला
की तुला स्वप्नातसुद्धा वावरावे लागते

रोज संध्याकाळचा मी डगमगत जातो जिथे
चालतो जो नीट त्याला सावरावे लागते

होइतो प्रत्यक्ष धोका मी तरी हे मानतो
वर्ष तर प्रत्येक धोक्याचे सरावे लागते

मैफिलीसाठी नको धाडूस तू बोलावणे
बैठकीसाठी मनाला अंथरावे लागते

गाठला हा वास्तवाचा काठ की भीतीमुळे
तीव्र ओहोटीप्रमाणे ओसरावे लागते

यापुढे आयुष्य बहुधा याचसाठी राहिले
जे इथे केलेस ते ते निस्तरावे लागते

Subscribe to RSS - रोज रात्री शोडषेला पंधरावे लागते