फुले किती बागेत उमलली
Submitted by पुरंदरे शशांक on 8 November, 2012 - 22:28
फुले किती बागेत उमलली
फुले किती बागेत उमलली
गोड गोडशी कितीतरी
फुलपाखरु होउनी जावे
गुंजत र्हावे फुलांवरी
रंग वेगळे किती किती ते
देतो यांना कोण बरे
वा-यावरती डोलत असता
भान हरपुनी मी निरखे
जाई जुई पांढरी शुभ्रसी
जास्वंदी ही लाल किती
केशरदेठी पारिजात हा
गंधित झाला परिसरही
गर्द जांभळी गोकर्णी ही
गुलाब फुलले कोमलसे
शेवंतीही पिवळी पिवळी
उन कोवळे पसरविते
ऊंचाउनिया मान केवढी
निशीगंधही उभा दिसे
मंद सुगंधी झुळका येता
मन मोहवुनि टाकतसे
शब्दखुणा: