म्हाताऱ्याची आत्महत्या
जगून खूप झालय जीवना
फूट आता मरून जातो
ओझे वाहून थकलो तुझे
पुरे आता फेकून देतो
तुझी उष्टी सुखं किती
ओरपून मी चाखली इथे
कळून चुकले पण आता
किती मज फसवले तू ते
किती असावे हलकट कुणी
खरेच दाखवून दिलेस तू
वेचलेल्या प्रत्येक फळात
किडीस पेरले होतेस तू
आणि फिरविले बैलागत
पोट चाकरी लावून पाठी
मरणाची दावूनी भिती
नाडलेस रे दिवसाकाठी
दिला तसाच देह फटका
सुमार व्याधीत मळलेला
अन अभिमानी मन वरती
मीठ जखमेवर चोळायला
वृद्ध घोडा मरून जाता
तुला फरक पडत नाही
पण तरीही लक्षात घे रे
तू मला मारत नाही
विक्रांत प्रभाकर