अपेक्षा नको

आनंदाचे गाणे व्हावे

Submitted by पुरंदरे शशांक on 24 June, 2019 - 22:38

आनंदाचे गाणे व्हावे

माळरानी एकांतात
रानफुले फुललेली
बहुरंगात रंगोनी
मस्त मजेत डोलली

नाही कौतुक कराया
नाही सुगंध लुटण्या
रंग गंध उधळिता
कोणी न ये त्या जाणण्या

अनामिक वाटसरु
जाई पहात तयांस
थबकून पूर्णपणे
वेडावून जात खास

करी नवल मनात
म्हणे कशी ही फुलत
नये कौतुकाला कोणी
वार्‍यावर डोलतात ?

गोंजारुन जाता तया
फुले गोड हसतात
सहजचि उमलोनि
नकळत व्हावे लुप्त

अपेक्षाचि न ठेविता
आनंदाचे गाणे व्हावे
दिस सरता सरता
हळु निघोनिया जावे...

अपेक्षा नको!

Submitted by आनंदयात्री on 9 August, 2012 - 08:18

अजून क्षणभर जगता यावे म्हणून मी रेंगाळत होतो
मुठीत आल्या वाळूलाही नजराणा मी समजत होतो!

कधी वाटले, प्रेम खुशीने झोळीमध्ये दिलेस माझ्या
कधी वाटले, भीक तुझ्या प्रेमाची कणभर मागत होतो

तळव्यावरती अलगद जपले होते अपुले रेशिमनाते
जपता जपता नकळत त्याला प्रेमाने चुरगाळत होतो

वर्तमान हा जगता जगता निसटुन गेला, कळले नाही!
गतकाळाचे बोट धरुन मी भविष्याकडे चालत होतो

'अपेक्षा नको', अपेक्षाच ही ठेवलीस ना अखेर तूही!
अपेक्षांमुळे नाते फुलते, हेच तुला समजावत होतो!

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - अपेक्षा नको