पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ७. खामोशी (१९६९)
रात्रीची शांत वेळ. कुठलंतरी हॉस्पिटल. पांढर्या कपड्यातल्या नर्सेसची तुरळक ये-जा. मंद वार्याच्या झुळुकीने हलणारे खिडकीचे पडदे. खिडकीला टेकून बाहेर बघत गात असलेला पाठमोरा तो. आणि हातात कालिदासाच्या 'मेघदूत' ची कॉपी घेऊन शांतपणे पायर्या चढत जाणारी ती. अधाश्यासारखं किती वेळा हे गाणं पाहिलंय आणि ऐकलंय काय माहित. काळीज कुरतडणाऱ्या चिंता आणि मेंदूचा भुगा करणारे प्रश्न दोन्हीच्या तावडीतून सुटायला दर वेळी ह्याच गाण्याने हात दिलाय. वेड लावणारी चाल आणि फक्त 'haunting’ ह्या एकाच शब्दाने वर्णन करता येतील असे शब्द.... "तुम पुकार लो......तुम्हारा इंतजार है".