काल स्टारबक्सला भेट द्यावी म्हणून बाहेर पडलो.. कॉफी घेतली, बरोबर कॉफी बेरी केकही घेतला.. आणि बाहेर खुर्च्यांवर गार वार्यात गप्पा मारत बसलो.. कॅलिफॉर्नियामधला उन्हाळा फारच सुंदर! जरा दुपारी दोन एक तास वाईट उकडतं खरं.. पण एरवी सुसह्यच! रात्री तर सुखद!! असंच इकडचं तिकडचं, दिवसभरातल्या गमतीजमती, ऑफीसमधली कामं तिथल्या गंमती, पुढचे व्हेकेशन प्लॅनिंग असं सर्वांगीण गप्पा झाल्यावर उठलो.. घरी जावसं वाटेचना.. निघालो लॉंग ड्राईव्हला..
लॉंग ड्राईव्ह.. ! आमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंददायी प्रकार! तशी मला फिरायची आवड आहेच. पण नवर्याला फिरायचे वेड आहे! आणि त्यासाठी लागणारे कष्ट उपसायची तयारी! कुठल्याही वेडयावाकड्या रस्त्यातून, कुठल्याही अडनिड्या वेळी तासन तास ड्राईव्हींग करायची त्याची तयारी असते, म्हणूनच आम्ही इतके फिरू शकतो.. कारण माझ्या हातात जर व्हील असते, तर मी कधीच अशा रस्त्यांना लागले नसते! काहीही कारण नसताना, विकेंड नसताना, केवळ हुक्की आली म्हणून ड्राईव्हला बाहेर पडणे आणि २-३ तासांनी परत येणे हे नेहेमीचेच.. नशीबाने राहतोय सुद्धा सुंदर जागी.. जिथून समुद्र १० मिनिटांवर, डोंगररांगा १५ मिन्टांवर आहेत..
आमच्या नेहेमीच्या जागा म्हणजे मालिबू कॅन्यन्स, सॅन्ता बार्बरा..
मालिबू कॅन्यन्स.. मालिबू या नावात किती ग्लॅमर आहे!
वेगवेगळ्या हॉलिवूडपटांमधून याचे दर्शन दिसते..सगळ्या स्टार्सची करमणूकीसाठी पडीक व्हायची जागा ही.. त्याच बड्या स्टार्सची व्हेकेशन होम्स देखील येथेच! तो समुद्र, ती समुद्राला अगदी लागून असणारी देखणी घरं, वळणावळणाचा रस्ता, डावीकडच्या डोंगरावर पसरलेली श्रीमंत लोकांची घरं.. या घरांवरून आठवले.. आयर्न मॅन या चित्रपटात त्या आयर्न मॅनचे घर याच भागात दाखवले आहे.. शूटींगही इथलेच.. आम्ही त्याचे ते घर दिसते का पाहय्ला कितीदा फिरलो इथून! तो सेट असणारे हे माहीत असून सुद्धा! कारण खरंच तसे भव्यदिव्य घर इथे प्रत्यक्षात असूही शकते.. इथून जरा पुढे गेले की लागतात मालिबू कॅन्यन्स.. लांबच्यालांब पसरलेल्या डोंगररांगा.. पण सगळे डोंगर अगदी जवळ जवळ असतात.. त्यामुळे दरीतून थोडं चालून गेलो तर शेजारच्या डोंगराकडे जाऊ, अशी डोंगरांची भाऊगर्दी!
दिवसा जितके सुंदर दिसतात, तितकेच रात्री भयाण! उन्हाळ्यातल्या रात्री नुसतेच काळे कभिन्न दिसतात.. मात्र हिवाळ्यात रात्री गेलात की दिसतात काळे डोंगर मात्र धुक्यात बुडालेले.. मी तिथे हिवाळ्यात जायला खरंच घाबरते! एक सही आहे तिथे.. याच डोंगर रांगांमधे आपली भारतीय दक्षिणी थाटातील देवळं वसली आहेत.. काळेकुट्ट डोंगर त्यात पांढरी शुभ्र देवळे! मस्त वाटतं..
आमच्या इथून सॅन्ता बार्बरा ही सुंदर सिटी खरंतर तासाच्या अंतरावर.. पण आम्ही कधीही उठून तिथे जातो.. लांब रस्ता आहे.. तळं,जंगलही लागते अधून मधून.. समुद्र .. तो काही आमची पाठ किंवा साथ सोडतच नाही! जिथे जाऊ तिथे तू माझा सांगाती.. वेगळवेगळया वेळचे ते दर्याचे रूप पाहणे म्हणजे काय आनंद असतो. गाणी असतातच गाडीत.. सॅन्ता बार्बराला जाताना उजवीकडे डोंगररांगा आणि डावीकडे अखंड समुद्र.. आणि नेमानी वाटेत भेटलेली ती डोंगरातली गूढ पेटती मशाल! सुरवातीला वाटायचे आग लागली आहे... इथे आग, वणवा नेहेमीचाच.. त्याचं काही वाटेनासं झालंय आता.. पण इतकुशी ती आग नेहेमीच कशी लागलेली असेल? मग तिला मशाल बनवून टाकले आहे.. एखादे हॉटेल वगैरे असेल डोंगरात.. काही कल्पना नाही! मात्र अंधार गुडूप झाला असताना तिथे ती मशाल दिसणं, हे जितकं गूढ आहे तितकंच छानही आहे! सॅन्ता बार्बराला जाताना जस्ट आधी एक चौक आहे.. तिथे हारीने उभी असलेली झाडांची गर्दी दिसते.. लांबचा कुठलातरी पूल दिसतो.. एका साईडने सर्फलायनर ही ट्रेन जात असते .. तर झाडांच्या गर्दीत मधूनच डोकावते, त्या चित्राला पूर्ण स्वरूप देणारे सुंदरसे तळे! मला ती जागा फार आवडते! सॅन्ता बार्बरा मधे आलो की मग मात्र रूप बदलते.. ही सिटी अगदीच वेगळी..वेगवेगळ्या हॉलिवूडपटांमधून आणि जिच्या नावावरच टीव्ही सिरिअल निघाली ती ही सिटी म्हणजे टूरिस्टांची पंढरी.. त्यामुळे सतत कोणीना कोणीतरी दिसतेच.. अखंड जाग असते या शहराला! दोन्ही साईडनी पामच्या रांगा.. डावीकडे समुद्र, त्याच्यावरचा तो पाण्यात घुसलेला , एकदा जळून परत नव्याने उभा राहीलेला सॅन्ता बार्बरा पीअर.. थोडं सरळ गेलं की हार्बर, एक मोठं मैदान जिथे रात्रीचे सुद्धा मोठाले दिवे लावून सामने चाललेले असतात, टुरिस्ट लोकांच्यासाठी हॉटेल्स, इन्स.. ते सोडून पुढे गेलं की गावातील सुंदर घरं सुरू होतात! इतका शांत एरिआ आहे हा.. की मी नवर्याला लगेच गाडी वळवायला सांगते.. शांतता जितकी सुंदर तितकीच भीतीदायकही वाटते.. मग आम्ही स्टेट स्ट्रीटला जातो.. इथला लक्ष्मी रोड म्हणाना ? अखंड गजबजलेला.. फॉर अ चेंज गाड्यांची नसून माणसांची गर्दी असलेला.. रात्रीच्या वेळी गेलात तर सगळी शॉपिंगची दुकानं बंद दिसतील, मात्र सगळी रेस्टॉरंट्स आणि डिस्क्स ओपन दिसतील.. ते नीळे जांभळे लाल लाईट्स, धुंद म्युझिक.. गाडीतून जाताना ओझरते कानावर पडते पण आपल्यालाही ती धूंदी जाणवते.. मग आम्ही परत येतो.. जाताना परत ती मशाल दिसते.. आता डावीकडे..
काल असंच विचार करत होतो या दोन्ही पैकी कुठे जावं.. नवर्याने गाडी घेतली पॅसिफीक वनला! हा, पॅसिफीक कोस्टल हायवे..
सॅन फ्रान्सिस्को पासून लॉस एंजिलीस पर्यंत टोटल अंतर ३५० मैल..नेहेमीच्या १०१ ने जा ये करतात लोकं.. पण हा पॅसिफीक कोस्ट हायवे कोणी घ्यायचे धाडस करत नाही.. कारण त्यात आहे, सतत २००-२२५ मैलाचा घाटातला वळणावळणाचा रस्ता, ज्यात एका साईडला डोंगर, दुसरीकडे समुद्र.. हो २००+ माईल्स हा समुद्र सतत दिसतो!! समुद्र आवडणार्याला पर्वणी! अर्थात पॅसिफीक वन हा त्याहून खूप मोठा रस्ता! आम्ही एकदा आलो इथून.. रात्रीचा प्रवास.. मी किती घाबरले त्याला तोड नव्हती.. त्यातून नवर्यानी गाडी त्यात डोंगराच्या माथ्यावर असलेल्या हॉटेलमधे थांबवून जेवण करण्याचा प्लॅन आखला..! त्या हॉटेलच्या समोर हा पॅसिफीक वन, त्याच्या समोर हा भला डोंगर आणि मागे काही नाही, फक्त दरी आणि खाली समूद्र.. हे ते Hotel Lucia on Pacific One !
काल आमच्या गावातून जाणारा तो पॅसिफीक वन पकडला.. आणि आलो घाटात.. ट्रॅफीक अगदीच कमी.. जे फार क्वचित होते.. समुद्र पाहून बोलती बंद! अतिशय शांत समुद्र.. काय थोड्या लाटा येतील तेव्हढ्याच..त्याच्यात अजुन भर म्हणून भरपूर धुके! शांत काळे पाणी.. त्यावरचे हलकेच उठणारे तरंग, बरोब्बर वर दिसणारा अर्धाच चंद्र! पौर्णिमेच्या चंद्राची मजाच और असते हे ऐकले/पाहीले होते.. पण हा असा अर्धा कापलेला चंद्रही इतका देखणा आणि तेजस्वी दिसतो हे पाहीले नव्हते.. त्याच्या प्रकाशात दिसेल इतकाच समुद्र आम्हाला दिसत होता.. आणि त्या समुद्राच्या लाटेबरोबर चंद्राचे प्रतिबिंबही धावत आमच्याकडे येत होते.. किती सुंदर दिसावं ते दृश्य? शब्द कमी पडतात! अगदीच प्रयत्न करून पाहीला.. बेकार झालाय.. पण ते असं वाटत होतं, की एक अखंड मोठा गुळगुळीत पृष्ठभागाचा चकचकीत काळा कातळ पसरलाय आणि त्यावर पारा सांडलाय.. शब्दबंबाळ आहे हे, पण असंच काहीतरी सुंदर होते ते..
तिथे गाडी लावून तो नजारा बघत बसलो.. डोळ्यात साठवत बसलो.. समुद्राची गाज कानात रूंजी घालत होती.. एक क्षण वाटले कॅमेरा कुठाय माझा? पण लगेच वाटले नाहीये तेच बरं..अशी दृश्यं डोळ्यात कॅप्चर करायची.. कॅमेर्याच्या फिल्म वर घेण्याच्या नादात आपण आपल्या मनाच्या फिल्मवर ती प्रतिमा घेत नाही.. नाही तेच बरं.. आणि खरंच दृशं कोरलं गेलं मनात.. कधीही विसरणार नाही मी कालची रात्र! कालचा लॉंग ड्राईव्ह..
परत येताना त्याच भयाण मालिबू कॅन्यन्स मधून आलो.. पण आज ते भयाण नाही वाटलं.. डोक्यात विचार समुद्राचेच.. आपण किती भाग्यवान आहोत याचा विचार सारखा डोक्यात येत होता.. इतकं सुंदर दृश्य आपण पाहू शकतो.. ते ही मध्यरात्री! आणि मनात असुरक्षिततेची भावना न येता पूर्णपणे रममाण होता येतं त्या निसर्गात.. ! फार भाग्यवान आहे मी! पहीली गोष्ट: मला असा नवरा मिळाला जो मला अशी ऍडव्हेन्चरस गोष्टी करायला मदत करतो, उद्युक्त करतो, दुसरी गोष्ट: मी अमेरिकेत अशा ठिकाणी आहे जिथे मला भरभरून निसर्ग दिसतोय.. आणि तिसरी गोष्ट: अमेरिकेत आहे.. जिथे रहीवाशांच्या सुरक्षिततेची काळजी नेहेमीच घेतली जाते, कुठल्याही क्षणी आपण बाहेर पडून हे सगळं अनुभवू शकतो!.. I am the luckiest person in the world ! I am so happy..!
भा, छान
भा, छान लिहिलस.
मालिबूच बालाजी मंदिर, खड्काळ समुद्र किनारा सुंदरच आहे. PCH लै भारी
मस्त
मस्त नेहमीसारखंच!!
--------------------------------------------------------------------------------
भिंतीला कान असतात आणि पाठीला डोळे!!!
कॅमेर्या
कॅमेर्याच्या फिल्म वर घेण्याच्या नादात आपण आपल्या मनाच्या फिल्मवर ती प्रतिमा घेत नाही.. >>>> अगदी बरोबर !!!
छान फोटोज आणि वर्णन पण !
मस्त जागा,
मस्त जागा, मस्त वर्णन, मस्त फोटो,मी तिथे गेलो तर तिथेच खिळून राहीन.
व्वा......भाग
व्वा......भाग्यश्री जबरदस्त छंद आहे ओ तुमचा. मानलं!
वर्णन आणि फोटो दोन्हीही मस्त !
अजुन खूप सारं भटकायला....आणि लिहायला शुभेच्छा.
________________________________________
प्रकाश
टचवूड!
टचवूड! मस्त लिहिलयंस बस्के.. अगदी मनापासून लिहितेस
मस्तच जमलय
मस्तच जमलय ! येउ दे अजुन..
मनाच्या
मनाच्या फिल्मवर ती प्रतिमा घेत नाही>>> घेतली तरी शब्दात व्यक्त करणं किती कठिण Santa Barbara, Solvang, Lake Cachuma, Calabasas, Pepperdine Campus, West lake village सर्वच परिसर नितांत सुंदर आहे.
मस्त
मस्त आहे.......... ...
सुंदर...
सुंदर... मस्त लिहिलं आहेस..
धन्यवाद
धन्यवाद सगळे !!
www.bhagyashree.co.cc/
खूप छान आहेत फोटो. मस्त धमाल
खूप छान आहेत फोटो. मस्त धमाल येत असेल अशा ड्राईव्ह्ज वर जायला.
छान लिहिलंय.. फोटो पण मस्त
छान लिहिलंय.. फोटो पण मस्त आलेत...
छान लिहीलयं...मी पण हया
छान लिहीलयं...मी पण हया ड्राईव्ह वर जाऊन आलेय...सहीच आहे. मला खरच कायमचं तिथेच रहाव वाटत होतं. तु लकी आहेस.
फोटो आणि लिखाण दोन्ही आवडलं.
फोटो आणि लिखाण दोन्ही आवडलं. शेवटला फोटो तर फारच सुरेख!
मस्त लिहिलं आहेस ग आणि फोटोज
मस्त लिहिलं आहेस ग आणि फोटोज पण छान आहेत!
आवडलं :).
छान लिहिलय... आम्ही SF to LA
छान लिहिलय...
आम्ही SF to LA त्या route १ वरुन गेलोय. काय अप्रतिम रस्ता आहे. तो ड्राइव्ह कधिच विसरणार नाही मी.
मस्तच लिहीलय... आणि फोटोज पण
मस्तच लिहीलय... आणि फोटोज पण सुरेख.
लोकंहो, एक सांगायला विसरले..
लोकंहो, एक सांगायला विसरले.. शेवटचे दोन फोटो गुगलवरून घेतलेत.. कॅमेरा नव्हता नेला ना मी, म्हणून ही वेळ आली!