डायरी..तीची-१

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

जून..
--
आज मला आईबाबा शाळेत एकटीच जा म्हणाले. मला थोडीशी भिती वाटतेय. शेजारचा जगूदादा माझ्याच शाळेत चवथीत आहे. तो आहे तसा बरोबर. तरी तो चवथीत आणि मी दुसरीत. रस्ता सरळ आहे. नागनाथपारापासून छोट्या नूमवीत जायचंय. सरळ उंबर्‍या गणपती चौकातून शनिवारात जायचं आणि मग उजवीकडे वळून पुन्हा आप्पा बळवंत चौकापर्यंत सरळ जायचं की आली शाळा..

पण जगूदादा म्हणाला लक्ष्मी रोडवरून जाऊ. त्याने मला हमाल वाड्यातून जाणारा रस्त्याने नेलं. पुणे मराठी ग्रंथालयाच्या शेजारी हमाल वाड्यातून बाहेर पडतो.

लक्ष्मीरोडला रस्त्यावरती खूप काय काय विकणारे लोक बसलेले असतात. दुकानाच्या खिडकीत पण छान छान वस्तू ठेवल्या असतात. मला आवडलं ते सगळं बघत बघत जायला.

--
आज आम्ही दोघं शाळेत जायला निघालो. उंबर्‍या गणपती चौकातल्या गिरणीपाशी माझ्या लक्षात आलं की दादा नाहीच्चे. मग मी जरा घाबरले. पण शाळेला उशीर होत होता. तशीच कडेकडेने पुढे जात राहीले. गाड्या सायकली लावल्या होत्या. भिंत आणि गाड्यांच्या मधे थोडीच जागा होती त्यातनंच जात राहीले. बाहेरच्या बाजूने गेलं की गाड्यांची भिती वाटते.

लक्ष्मी रस्ता ओलांडून पलिकडे कसं जाणार. इतक्यात कुणी एक काका रस्ता ओलांडत होते. माझ्या गालापाशीच डोळ्यासमोर त्यांचा हात दिसत होता. चटकन त्यांचा हात पकडला. ते कोण काका होते त्यांच्याकडे पाहीलंच नाही. रस्ता ओलांडल्याबरोबर त्यांचा हात सोडून फूटपाथवरुन पळून गेले. हमालवाड्यातून जाता येणार होतं. शिवाय लक्ष्मीरोडवरून गेल्यामुळे गम्मत पाहता येईल.

नंतर जगूदादा भेटला तेव्हा हसत होता म्हणला मी लपून बसलो होतो तुझी गम्मत पहायला. मला गम्मत नाही वाटली.

----
नीता आणि मी मधल्या सुट्टीत मैदानावर फिरत होतो. नीता माझी खास मैत्रिण आहे. तिच्या पायाला भाजलंय. पिनोफ्रॉक घातल्यावर पोटरीवरचे फोड ट्म्म फुगलेले दिसत होते. कसेतरीच घाण दिसत होते. तीला खूप दुखत असणार. नीता खूप शांत आहे. माझं आणि तीचं छान जमतं. मातीकामाच्या वर्गाच्या जवळ प्राजक्ताचं झाड आहे. त्या झाडाखालचा कट्टा आम्हाला दोघींना बसायला आवडतो. आम्ही दोघी जंगलजीम वर किंवा इतर दंगा करत असलेल्या मुलामुलींसारखा दंगा करत नाही. दोघी गप्पच बसतो. थोडसं कधी कधी हसतो. पण आवाज करुन नाही हसत आम्ही कधीच. नुसतेच ओठ लांब करुन हसतो.

--
नीताची आई मस्त दिसते. छान उंच आहे. ती शाळेत बाई आहे. मस्त साड्या नेसते. गोड हसते. ती पण शांत आहे. मोठ्ठ्यामोठ्ठ्यांदा कधी बोलत नाही, हसत नाही. मी नीताकडे रहायला गेले होते. नीताच्या आईने बटाट्याची भाजी केली होती. मला आवडली त्यांच्याकडची भाजी. नीताचे बाबा नोकरी करतात ते दिवसभर घरी नसतात. नीताचे बाबा जरा कडक आहेत. त्यांना सगळे घाबरतात असं वाटलं.

--

----काल्पनिक----

विषय: 
प्रकार: 

छान सुरवात.

मस्त सुरुवात पुढे वाचायचि उत्सुकता आहे.

********************####**************************
माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!

लिही ग पुढं, छान चाललयं.. Happy

म्याडम, लवकर पूर्न क्रावे!

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!